संसदेत विविध मुद्द्यांवर चर्चा न होण्याला कारणीभूत ठरलेल्या पेगॅसस पाळत प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी अनुकूलता दर्शवली होती. पेगॅसस पाळत प्रकरणाच्या या वादाबाबत मी वर्तमानपत्रांमध्ये जे काही वाचले आहे, तेवढीच मला या विषयाबाबत माहिती आहे, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाईट कामांसाठी होऊ शकतो, हे सर्वाना माहीत आहे. लोकांच्या मोबाईवरील संभाषण टॅप करण्याचे प्रयत्न झाले असतील, तर या प्रकरणाचा तपास करणे योग्य ठरेल, असे आपल्या आठवडी जनता दरबारानिमित्त त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं आहे.
“मी नितीश कुमार यांचा आभारी आहे. ते नेहमीच एक आदर्श नेते राहिले आहेत. ते सरकारसोबत आहेत पण त्यांचं मन आमच्यासोबत आहे, मला माहित आहे. जर ते म्हणत असतील की पेगॅसस प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे,तर विरोधी पक्ष ही तेच म्हणत आहेत जे त्यांनी सांगितलं आहे.मोदीजींनी आता तरी ऐकावं,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी या विरोधी पक्षांच्या मागणीबाबत विचारले असता, संसदेच्या सभागृहांमध्ये काय चालले आहे त्यावर मी भाष्य करू शकत नाही,असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले होते. पेगॅसस पाळतप्रकरणी कोणाकडे ठोस माहिती असेल तर ती सरकारला द्यावी. सरकार त्याबद्दल प्रामाणिकपणे चौकशी करेल,अशी मला खात्री वाटते,असेही नितीशकुमार यांनी सांगितले होते.