Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केवळ धनुष्यबाणच नाही तर शिंदेंचा पक्षाध्यक्ष पदावरही दावा; निवडणूक आयोगाला दिले पत्र

shinde
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (08:47 IST)
धनुष्यबाण चिन्हावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातला संघर्ष अजून सुरु आहे. दोन्ही गट चिन्हावर दावा दाखल करत आहेत. आता धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावे म्हणून शिंदे गट सक्रिय झाला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. आम्ही त्यांची अध्यक्षपदासाठी निवड केली असल्याने आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह मिळायला हवं, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
 
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली आहे. त्यामुळे पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, असं शिंदे गटाने आपल्या अर्जात म्हटलं आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून हा दावा केला आहे. तसेच आम्ही काही पुरावे दिले आहेत.
 
आणखी पुरावे दिले जाणार असल्याचेही आयोगाने आपल्या पत्रात नमूद केले आहे. मात्र, निवडणूक आयोग आज धनुष्यबाण चिन्हावर कोणताही निर्णय घेणार नाही. याबाबतची सुनावणी लांबणीवर पडल्याने धनुष्यबाण कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू नये म्हणून शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे.
 
काय म्हटलंय अर्जात?
शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे असून, तसेच १८ पैकी १२ खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १४४ पक्षाचे पदाधिकारी आणि ११ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. या दाव्याला पुष्टी देणारे प्रतिज्ञापत्र तसेच अन्य कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. याबरोबरच, अजूनही पुरावे तसेच कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही शिंदे गटाच्या अर्जात म्हटण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इयत्ता तिसरीपासून सुरू होणार परीक्षा; शिक्षण मंत्री केसरकरांची माहिती