महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्याचसोबत बघायचं एकाकडे आणि हात द्यायचा दुसऱ्याला असं मी करत नाही म्हणत आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझा विश्वास कुणावर नाही असं नाही. जिथे जुळायचं असते तिथे १०० टक्के जुळले पाहिजे. बघायचं लेफ्टकडे आणि हात टाकायचा राईटकडे अशी जी व्यवस्था असते ती मला चालत नाही. मी महाविकास आघाडीचा अद्याप भाग नाही आणि माझी होण्याचीही इच्छा नाही. माझी युती शिवसेनेशी आहे. शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे हा त्यांचा प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच महाविकास आघाडीचा आमचा काही संबंध नाही. त्यामुळे निर्णयाचा संबंध नाही. मी कुणाच्या निर्णयाची प्रतिक्षा करत नाही. २०२४ विधानसभा निवडणुकीपर्यंत ज्या निवडणुका येतील त्या सगळ्या ठाकरे शिवसेना आणि आम्ही एकत्रित लढणार आहोत. ज्याने त्याने कोण कोणासोबत आहे हे पाहावं. मैत्री करायची तर ती प्रामाणिक करायचा. समझौता करायचा तर प्रामाणिक करायचा. समझौता करायचा नसेल तर करू नये. प्रत्येकाने आपापली भूमिका घ्यावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor