Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता कांदा गेला चोरीचे लाख रुपयांच्या चाळीस गोण्या कांदा चोरीस

आता कांदा गेला चोरीचे लाख रुपयांच्या चाळीस गोण्या कांदा चोरीस
, बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (10:36 IST)
कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने, पिकाला किंमत प्राप्त झाली आहे. यामुळे आता पुन्हा चोरट्यांनी कांदा चाळीकडे मोर्चा वळवला आहे. आता चोरट्यांनी बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे कांदा चोरी केली आहे. चोरट्यांनी साठवलेल्या चाळीतून ४० गोणी कांदा चोरून नेला आहे. यामुळे शेतकऱ्याला सुमारे एक लाख २५ हजार रूपयांचा आर्थिक  फटका बसला आहे.
 
राज्यात आणि नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतक-याला चोरट्यांच्या या चोऱ्यांमुळे हैराण केले आहे. कांद्याचे वाढलेले दर चोरट्यांना एकप्रकारे चोरी करण्यास भाग पाडत आहे.
 
बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील रावेर शिवारातुन शेतकरी मुस्ताक इसाक शेख यांच्या कांदा चाळीतून जवळपास १ लाख २५ हजार रुपये किमतीचे कांदे चोरट्यांनी चोरले आहे. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील ताहाराबाद- अंतापुर रस्त्यावरील रावेर शिवारातील गट नंबर २३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ असून, त्यांनी काही कांदा साठवून सुरक्षित ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रथम सोबत आणलेल्या भेळ भत्त्यावर त्याच ठिकाणी कांद्याबरोबर ताव मारला आणि नंतर चाळीत साठवून ठेवलेल्या ६२ गोणींपैकी ४० गोणी कांदा सोबत आणलेल्या वाहनात टाकून चोरून पळून गेले आहे.
 
हा प्रकार घडल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटचे साखळी, कुलूप तोडून कांद्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी खाल्लेल्या भत्यातील मुरमुरे व कांद्याची टरफले येथे पडलेली होती.
 
घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. याआधी अंतापुर- मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर ३४७ मध्ये उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी, संजय पानपाटील यांच्या विस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल, यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य इत्यादी चोरीस गेले आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले असतांनाच चोरटे आता कांदे व शेतीउपयोगी साहित्य व उत्पादने चोरी करू लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार