Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा
, बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (08:42 IST)
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
 
सध्या निर्बंध वाढविण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. संख्या कुठे वाढते आहे? का वाढते आहे, यावर विशेष लक्ष आहे.पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.नागपूरच्याबाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
 
७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल तेव्हा लावणार निर्बंध
आरोग्यमंत्री टोपे  म्हणाले की, ऑक्सिजनच्याबाबतीत गेल्या वेळी १३०० मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती, आता १४०० ते १५०० मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचे ४५० प्लान्टची उभारणी करण्यात येत असून त्यातील अडीचशे प्लान्टस उभारले आहेत, उर्वरित प्लान्ट लवकरच कार्यन्वित होतील.ऑक्सिजनची साठवणूक क्षमता वाढविण्यासह ड्युरा सिलेंडर्सची संख्या वाढवत असून त्यामुळे आपल्याकडे १९०० ते २००० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनची उपलब्धता होऊ शकते.केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करताना खूप मोठा आकडा सांगितला आहे. ज्यादिवशी ७०० मेट्रिक टनच्या वर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरू करू अशा प्रकारची अधिसूचना आरोग्य विभागाने काढली आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असे सांगून ही दक्षता लोकांच्या जीवितेच्या दृष्टिकोनातून घेणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी