महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात दररोज तब्बल 64 लाख रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एक लाख अंगणवाडय़ांमधील तब्बल आठ लाख लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे बोगस असल्याचे उघड झाले आहे.
अंगणवाडय़ांमध्ये नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांची नावे आधारशी लिंक केली असता आठ लाख बोगस नावांची नोंदणी केल्याची माहिती समोर आल्याचे महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून ती नावे तत्काळ वगळली जातील, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.