Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर, पाहा फोटो

vithhal mandir
, बुधवार, 17 जुलै 2024 (12:52 IST)
आषाढी वारी सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अठरा लाखांहून अधिक वारकरी भाविक पंढरीत दाखल झाले असून चंद्रभागा नदीच्या तीरावर आणि नगरीत भक्तांचा महासागर लोटला आहे.
 
परंपरागत वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीचे स्नान, नगर प्रदक्षिणा करणेसाठी भल्या पहाटे पासून रांगा लावलेल्या दिसत होत्या.
 
भाविकांची ही लगबग सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह पत्निक श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा केली. पूजेनंतर त्यांनी राज्यातील जनता सुखी समृद्ध राहू दे पुरेसा पाऊस होवू दे असे साकडे घातले.
 
वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील दापत्याला मिळाला.
 
देवाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत दोन लाखाहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी अठरा ते वीस तास लागत आहेत एक मिनिटामध्ये 30 ते 35 भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
शेतकरी बाळू शंकर अहिरे, वय 55 वर्षे, सौ. आशाबाई बाळू अहिरे वय 50 वर्षे. मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
 
यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
 
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक महापूजा केली.
 
महापूजेवेळी प्रशासनातील अधिकारी आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यही उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापूजेनंतर म्हणाले की "हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
 
"आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे.
 
"यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे", असे त्यांनी सांगितले.
 
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर केलेले आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे.
 
webdunia
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
 
मंदिर समितीचा एमटीडीसी सोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल.
 
तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
 
त्याप्रमाणे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
 
webdunia
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महा आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आत्तापर्यंत 8 लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, 15 लाख नागरिक या आरोग्य सुविधांच्या लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे.
 
तसेच पंढरपूर येथे देश विदेशातून लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधाबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी लवकरच एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार गटाला मोठा झटका, चार नेत्यांनी दिला राजीनामा सहभागी होणार शरद पवार गटात