शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं गोठविल्यानंतर नव्या नावाबाबत तीन पर्याय आणि नव्या चिन्हाबाबत तीन पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे रात्री उशीरापर्यंत सादर केले नव्हते. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिंदे गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री उशीरा बैठक पार पडली. या बैठकीत नावे आणि चिन्हांबाबत चर्चा झाल्याचे समजते.
तलवार, गदा आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत शिंदे गटाच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र निर्णय झाला नसल्याचे समजते. निवडणूक आयोगाला कोणती तीन नावे आणि कोणती तीन चिन्हे सादर करायची याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार शिंदे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्याचे समजते. सोमवारी शिंदे गट याबाबत पत्रक काढून आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने ही पर्यायी नावे आणि चिन्हे सादर करण्याासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्या मुदतीच्या आधी शिंदे गट नावे आणि चिन्हे सादर करण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने यापूर्वीच ती सादर केलेली आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor