Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
, सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (15:49 IST)
मानाचे वारकरी म्हणून श्री. कोंडीबा व सौ. प्रयागबाई  टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान
पंढरपूर, - महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते.  यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सौ. सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कोंडीबा देवराव टोणगे , सौ. प्रयागबाई कोंडीबा टोणगे, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले आदी उपस्थित होते.
 
श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने राज्यावर आलेले कोरोनाचे संकट कमी होत असून येणाऱ्या काळात संपूर्ण जगातून कोरोना नाहीसा होवो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना आहे असे  सांगून श्री. पवार म्हणाले, चीन, रशिया व युरोप देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शासन कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. दोन्ही डोस घेतले असले तरी प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर केलाच पाहिजे. तसेच शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे ही एक नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. कोरोना काळात आपल्या जिवाभावाचे अनेक लोक दगावले. या काळात माणसाचा जीव खूप महत्त्वाचा होता तसेच आपली श्रद्धा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहून सर्व प्रशासकीय नियमाचे पालन करून राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा शासनाने निर्णय घेतला. तसेच कार्तिकी वारीसही परवानगी दिली.
webdunia
मंदिर समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक
 
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने मंदिर विकासाच्या आराखड्यासह विविध मागण्या केलेल्या आहेत. त्याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. ते म्हणाले,  मंदिर परिसर विकासासाठी केंद्राकडून मदत मिळण्याबाबतही प्रयत्न करण्यात येतील. तसेच पालखी महामार्गाच्या कामात राज्य शासन केंद्राला सहकार्य करणार आहे.
 
या वर्षीच्या कार्तिकी वारीस एसटी संपामुळे वारकऱ्यांची संख्या कमी आहे असे नमूद करून  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य शासनाकडून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
जातीय सलोखा राखणे ही आपली परंपरा
 
त्रिपुरा येथील घटनेमुळे राज्यातील मालेगाव, नांदेड व अमरावती येथे काही घटना घडल्या. अशा प्रकारांमुळे पोलिसांवर ताण पडतो.  राज्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. जातीय सलोखा राखण्याची आपल्या राज्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
 
प्रारंभी मानाचे वारकरी श्री.कोंडीबा टोणगे, सौ. प्रयागबाई कोंडीबा टोणगे(मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जि. नांदेड) यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री व सौ टोणगे यांना राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने  देण्यात येणारा प्रवास सवलत पास श्री. पवार यांनी सुपूर्द केला. शासकीय महापूजा संपल्यानंतर तात्काळ श्री.विठ्ठल दर्शनास सुरुवात झाली.
 
यावेळी  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,  पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम, तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विलास राठोड आदी उपस्थित होते.
 
महत्वाचे मुद्दे:-
 
कोविडच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी
 
नियमांचे पालन करून राज्यातील मंदिरे खुली करण्याचा शासनाचा निर्णय
 
राज्य शासनाकडून एस.टी. संपाबाबत सकारात्मक तोडगा करण्याचा प्रयत्न
 
राज्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे
 
मंदिर समितीच्या विविध मागण्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

5,000mAh बॅटरी आणि 13MP कॅमर्‍यासह Vivo Y15A लाँच, जाणून घ्या किंमत