गोंदिया जिल्ह्यात बकऱ्यांची झाड्याच्या फांद्या आणायला पालेवाडा जंगल परिसरात गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला त्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वन विभागला ही माहिती गावातील काही लोकांनी दिली.
सदर घटना शुक्रवारी गोंदियाच्या जामडी वनक्षेत्रातील एफडीसीएम राखीव जंगलाच्या कंपार्टमेंट क्रमांक 420 मध्ये घडली आहे. या जंगलात गुऱ्यांसाठी चारायला झाड्याच्या फांद्या आणायला गेलेला एका 44 वर्षीय व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. बसंत राव ढोर असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. बसंत हे कलपथरी ता. गोरेगाव चे रहिवासी होते.
13 सप्टेंबर रोजी बसंत हे मुंडीपार ते मुरदोली दरम्यान पालेवाडा जंगल परिसरात गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला केला ते जागीच ठार झाले. संध्याकाळ पर्यंत ते घरी परतले नाही. त्यांचे कुंटुंबीयानी त्यांचा शोध घेण्यात सुरु केले नंतर त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली.
पोलिसांनी 14 सप्टेंबर रोजी त्यांना शोधत असताना त्यांचा मृतदेह पालेवाडा जंगल परिसरात आढळला. त्यांच्या मानेवर वाघाच्या दाताच्या खुणा आढळल्या.
या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वनविभाग पथकाने मोहीम राबवून वाघाला पकडण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.