राज्यातल्या एकूण १६ जिल्ह्यांत सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशांनुसार राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना याबाबत पत्र लिहिले आहे.
“महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. तसेच, लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० आयएसओ टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावे”, अशी मागणी या पत्रातून केली आहे.
“राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २४ हजार ७८७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांत सातत्याने सक्रीय रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होतेय. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केले जात आहे”, असे सीताराम कुंटे यांनी पत्रात नमूद केले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र पाठवले.