भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांना सल्ला दिला आहे. पडळकर म्हणाले की, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एकजूटीने लढा दिला आहे. कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळे शरद पवार यांना तुमच्या विषयाबाबत खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडले, असे पडळकर म्हणाले
दरम्यान पुढे पडळकरांनी विनंती केली आहे की, अनिल परब हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सगळे दरवाजे ठोठावत आहेत. त्या पेक्षा स्वतः आझाद मैदानात जाऊन तुम्ही मराठी एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा का करत नाहीत त्यांना आश्वासित करावं की बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेची दारे खुली होती. मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, एखादा मोर्चा मुंबईत आला तर त्या मोर्चास आमचे मंत्री सामोरे जातील त्यांच्यासोबत चर्चा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द पाळण्यासाठी दोन पाऊले पुढे जा आणि एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढा त्यांच्याशी चर्चा करा आणि तोडगा काढा असा सल्ला पडळकरांनी अनिल परबांना दिला आहे.