येत्या 29 रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या पांडुराया आणि रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपुरात संतांचा मेळावा लागणार असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी दूरवरून वारकरी येतात. मात्र शासकीय महापूजेच्या कालावधीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी वाट बघावी लागते. वारी काळात विठोबा-रुक्मिणीचे दर्शन आता सुलभ आणि जलद व्हावे या साठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या कालावधीत मुखदर्शन सुरु राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून पालक मंत्री राधाकृष्ण विखें पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मंदिर समितीला तशा सूचना दिल्या आहेत.
आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे अडीच वाजता सपत्नीक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करणार आहे. या महापूजेच्या कालावधीत भाविकांसाठी मुखदर्शन बंद ठेवले जाते. त्यामुळे रांगेवर ताण येतो. आता भाविकांचा ताण कमी करण्यासाठी शासकीय महापूजेच्या कालावधीत भाविकांना विठ्ठल रखुमाईचे मुखदर्शन करता येणार. तसेच शासकीय महापूजेनंतर व्हीआयपी साठीचे दर्शन देखील बंद करण्यात येईल.
हा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या उपस्थितीत आषाढी यात्रा नियोजनाच्या बैठकीत पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला.