Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pankaja Munde : मला आता एक दोन-महिन्यांच्या ब्रेकची गरज, मी सुट्टी घेणार आहे

pankaja munde
, शुक्रवार, 7 जुलै 2023 (13:35 IST)
Pankaja Mundes big decision  माझ्या राजकीय भूमिकांशी प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला असल्यामुळे मी कन्फ्युज झाले आहे. मी राजकारणात आल्यापासून वीस वर्षं सुट्टी घेतली नाही. मला आता एक-दोन महिन्यांच्या ब्रेकची गरज आहे. मला अंतर्मुख होण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
 
अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणारे एक मंत्री होते धनंजय मुंडे.
 
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं अगदी स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंतचं विरोधाचं राजकारण आता नवीन नाही. 2019 मध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता.
 
त्यामुळे धनंजय मुंडे यांना भाजपने सोबत घेतल्यानंतर पंकजा यांची कोंडी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्याचबरोबर त्या कोणत्या पक्षात जाणार, याविषयीही चर्चा सुरू होत्या.
 
पण स्वतः पंकजा यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्याला पूर्णविराम दिला.
 
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उद्विग्नता व्यक्त करत पंकजा यांनी आपण थोडा काळ सुट्टी घेत आहे असं म्हटलं.
 
मी आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यावर सुधीर गाडगीळांना मुलाखत दिली होती. यामध्ये मी म्हटलं होतं की, जेव्हा माझ्या आयडिऑलॉजीसोबत प्रतारणा करण्याची वेळ येईल, चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील, तेव्हा मी राजकारणातून एक्झिट घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही.
 
आताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची गरज आहे आणि तो मी घेणार आहे, असं पंकजा यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं.
 
दरम्यान, मंत्रिमंडळातल्या समावेशानंतर पंकजा यांनी आज (7 जुलै) धनंजय मुंडे यांचं औक्षण करून स्वागत केलं.
 
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं की, राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा ताईने माझं औक्षण केलं आणि शुभेच्छा दिल्या.
 
पाठीत खंजीर खुपसण्याचा माझा स्वभाव नाही
गेल्या काही दिवसांपासून मी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याच्या चर्चा सुरू होत्या. त्याकडे मी गांभीर्याने पाहिलं नाही. पण परवा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. मी सांगलीच्या एका नेत्याच्या माध्यमातून राहुल गांधींना भेटले आणि काँग्रेसच्या वाटेवर आहे, असंही म्हटलं होतं. अशा बातम्यांच्या माध्यमातून माझं राजकीय करिअर संपवण्याचा कट कोणाचा, असा प्रश्न पंकजा यांनी या पत्रकार परिषदेत विचारला.
 
पाठीत खंजीर खुपसण्याचा माझा स्वभाव नाही आणि खुपसलेला खंजीर योग्य कसा हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असंही पंकजा यांनी म्हटलं.
 
“प्रत्येक वेळेला एखाद्या पदासाठी माझ्या नावाची चर्चा होते आणि ते पद मला मिळत नाही. त्यामुळे या चर्चा होतात. हा दोष माझा नाही. यासाठी पक्षाने उत्तर द्यायला हवं की, एखाद्या पदासाठी पंकजा मुंडे पात्र आहेत किंवा नाहीत. मी स्वतः किती वेळा हे सांगणार?” असं म्हणत पंकजा यांनी आपली पक्षाबद्दलची नाराजीही बोलून दाखवली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे केस कापले, शाळेतून काढले