राष्ट्रवादीचं २ दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय नेत्यांनी पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. मी राष्ट्रीय पातळीवर जास्त भाष्य करत नाही. मला बोलण्याची संधी दिली परंतु वेळेअभावी बोलता आले नाही. केवळ मी नाही तर सुनिल तटकरे, वंदना चव्हाण आणि ५-६ जणांना भाषण करता आले नाही. शरद पवारांचे ३ वाजता समारोपाचं भाषण सुरू होणार होते. नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नाही अस सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीवर खुलासा केला आहे.
अजित पवार म्हणाले की, पक्षाने मला उपमुख्यमंत्रिपद दिले, विरोधी पक्षनेतेपद दिले. मी नाराज कशाला होऊ? राष्ट्रवादीने मला कधी डावललं नाही. मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तूस्थिती आधारित बातमी देण्याची जबाबदारी माध्यमांसमोर आहे. मी २१ वर्षात राष्ट्रीय पातळीवर जातो परंतु कुठे भाष्य करत नाही. राज्यात अधिवेशन असलं, कार्यक्रम असलं तर मी भाषण करतो. तुमचे गैरसमज दूर करून राज्यासमोरील प्रश्नाबाबत भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे असं त्यांनी म्हटलं.