Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pawar vs Pawar in Baramati बारामतीत 'पवार विरुद्ध पवार'? सुप्रिया सुळेंना आगामी निवडणूक किती आव्हानात्मक?

ajit sharad panwar supriya
, बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (08:35 IST)
दीपाली जगताप
Pawar vs Pawar in Baramati “आमच्यावर करा काहीही करा, बापाचा नाद नाही करायचा. बाकी काहीही ऐकून घेऊ. महिला आहे मी. काही छोटं बोललं तरी टचकन डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तीच महिला पदर खोचून अहिल्या होते, तीच ताराराणी होते, तीच जिजाऊ होते,” राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर पहिल्याच सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत ही प्रतिक्रिया दिली.
 
सहा दशकांहून अधिक काळापासून राजकारणात असलेल्या आणि देशाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या पक्षात उभी फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आता पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला. अजित पवार यांनी थेट पक्षावरच दावा केल्याने याची कायदेशीर लढाई तर सुरूच राहील. पण आगामी निवडणुकीत प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना पहायला मिळणार याचीही चर्चा सुरू झाली.
 
याअनुषंगाने राज्यातील जनतेचं सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. बारामती हा पवार कुटुंबियांचा हा गड मानला जातो. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे तीन टर्मपासून खासदार आहेत. यापूर्वी शरद पवार या मतदारसंघाचे खासदार होते. तर अजित पवारही या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
 
असा हा पवारांचा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाला. 2014 आणि 2019 मध्ये भाजपनेही बारामतीत आपली ताकद लावली. पण दोन्हीवेळेस सुप्रिया सुळे निवडून आल्या. “आम्ही अमेठीत करू शकतो तर बारामतीतही करू शकतो,” अशीही वक्तव्य यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी केली आहेत. आता स्वत: अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाल्याने बारामतीची राजकीय समीकरणं बदलली आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं असलं तरी बारामतीत ‘दादा विरुद्ध ताई’ अशी रंगतदार लढत होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
 
आता ते प्रत्यक्षात ‘ताईं’विरोधात आपला उमेदवार देतात का? किंवा सुप्रिया सुळेंविरोधात भाजपसोबत प्रचार करतात का? हे पहावं लागेल. परंतु यानिमित्ताने सुप्रिया सुळे यांच्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक किती आव्हानात्मक आहे? बारामती लोकसभा मतदारसंघात आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची साथ दादांना मिळते की ताईंना? असेही अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
 
सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा?
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळू शकते असे वृत्त आहे. सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात नाहीत. परंतु त्यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे. तसंच त्या ‘हाय टेक टेक्स्टाईल पार्क बारामती’ या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. तर 'एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्याही अध्यक्षा आहेत. या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मात्र सुप्रिया सुळेच बारामतीतून निवडणूक लढवतील आणि विजयी होती अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी बारामतीत सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्या म्हणाल्या, “आमच्याकडून ही लोकशाही आहे. मला असं वाटतं की कोणीतरी माझ्याविरुद्ध लढणारच ना. आपण सगळ्यांनीच याचा मान-सन्मान केला पाहिजे. तीन वेळा भाजप माझ्याविरुद्ध लढला आहे. याही वेळेस कोणीतरी लढणारच ना. मी मनापासून लोकशाहीचं स्वागत करते.”
 
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर दिलं. बारामतीतून सुनेत्रा पवार यांचं नाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे. याबाबत पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “मी तुमच्याकडूनच ऐकतोय.”
 
भाजपने मात्र महायुतीचाच उमेदवार बारामतीतून निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “महायुतीचाच उमेदवार बारामतीत निवडून येणार. केवळ बारामतीत नाही तर राज्यात 48 लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार. आज बारामतीतले काही लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण बारामती लोकसभेची जागा आम्हीच जिंकणार आहोत.”
 
बारामती लोकसभा मतदारसंघाचं बदललेलं समीकरण
'बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती' हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आत्तापर्यंत पक्कं झालं आहे. पण अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत सामना हा 'पवार विरुद्ध पवार' असा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात शरद पवार वरचढ ठरतात की अजित पवार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
पवार कुटुंबियांचं वर्चस्व बारामतीत दिसून येत असलं तरी प्रत्यक्षात बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे आणि कोणत्या नेत्याच्या बाजूने किती आमदार उभे राहतात हे गणित महत्त्वाचं आहे.
 
2009 साली सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट देशभरात होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासमोर रासपच्या महादेव जानकर यांचं आव्हान होतं. ही लढत अगदी अटीतटीची झाली होती. केवळ 69 हजार 719 मतांनी सुप्रिया सुळे जिंकल्या होत्या. तर 2019 मधील निवडणुकीत भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा 1 लाख 55 हजार मतांनी विजय झाला होता.
 
बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर-हवेली, खडकवासला आणि भोर हे विधानसभा मतदारसंघ आहेत.
 
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विद्यमान आमदार आहेत.
दौंड मतदारसंघात भाजपचे राहुल कुल आमदार आहेत.
तर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत.
भोर-वेल्हा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे
पुरंदर-हवेली मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत.
तर इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत.
अजित पवार महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले तर सुप्रिया सुळे यांची ताकद वाढवण्यासाठी केवळ काँग्रेसच्या आमदारांची होईल. परंतु संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांचे आणि शरद पवार यांचे संबंध सलोख्याचे नाहीत असं म्हटलं जातं यामुळे भोर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जातो. तर संजय जगताप आणि अजित पवार यांचे संबंध चांगले असल्याने ते अजित पवार यांना मदत करू शकतील असंही म्हटलं जातं.
 
खडकवासलाचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं आहे. शिवाय, इंदापूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांचंही वर्चस्व आहे. यामुळे अजित पवार गटाची ताकद इथे वाढू शकते.
 
हिंदुस्थान टाईम्सचे पुणे ब्यूरो चीफ योगेश जोशी सांगतात, “2014 मध्ये सुप्रिया सुळेंना निवडणूक जड गेली होती. नंतर 2019 साठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार यांनीही मेहनत घेतली होती. पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. त्यांचा खंदा समर्थक अजित पवार आता त्यांच्यासोबत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षात हा विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांना एकनिष्ठ आहे. आताही असं आढळलं की अजित पवार यांना समर्थन तिकडे अधिक आहे. यामुळे तिकडून किती लीड मिळते हा भाग आहे.”
 
“खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर निवडून येतात. तिथेही सुप्रिया सुळे यांना जड जाऊ शकतं. राहुल कुल दौंड मतदारसंघात आहेत. म्हणजे तिथेही भाजपची ताकद अधिक आहे. सासवडचे संजय जगताप सोडले तर बाकी कोणी आमदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत सध्यातरी दिसत नाही. यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी यावेळेसची परिस्थिती आव्हानात्मक आहे. म्हणूनच त्या अजित पवार यांच्यावर थेट टीका करत नाहीत. जुळवून घेण्याची भाषा करतात. अजित पवार यांनीही थेट टीका केलेली नाही,”
 
ते पुढे सांगतात, “अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या भेटी बारामतीत वाढल्या आहेत. तिकीट कोणाला मिळेल हा नंतरचा भाग आहे. पण सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक सोपी नाही हे सध्यातरी दिसतं. खासगीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात की पवार कुटुंबातून कोणी उभं राहिलं तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी आणखी जड जाईल. तसंच अजित पवार घरातून उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातून कोणीही नाहीय. यामुळे बंडखोरी नंतर कुटुंबातून कोणी सक्रिय होणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे.”
 
ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांना मात्र ही निवडणूक सुप्रिया सुळे यांना खूप जड जाईल किंवा आव्हानात्मक असेल असं वाटत नाही. ते सांगतात, “सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक जड जाईल असा निष्कर्ष लगेच काढता येणार नाही. याचं कारण म्हणजे बारामतीत आजही शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय, गेल्या 15 वर्षांपासून सुप्रिया सुळे तिथे खासदार आहेत. यामुळे त्याचं कामही आहे. शिवाय, पक्षात दोन गट झाल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती आहे. यामुळे पवारांची पुण्याई आणि तीन टर्म खासदार असल्याने सुप्रिया सुळे यांच्यासमोर खूप मोठं काही आव्हान उभं राहील असं वाटत नाही.”
 
बारामतीची निवडणूक मात्र रंजक होईल, लक्षवेधी होईल असं म्हणता येईल असंही ते सांगतात.
 
परंतु अजित पवार आपल्या कुटुंबातील सदस्याला निवडणुकीत उभं करतील का किंवा सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार करतील का? हे अद्याप स्पष्ट नाही.
 
“अजित पवार जोपर्यंत उमेदवार देत नाहीत तोपर्यंत आपण याबाबत काही ठोस सांगू शकत नाही. ब्लड इज थीकर दॅन वॉटर असं म्हणतात. यामुळे या मतदारसंघापुरतं अजित पवारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर याचीही शक्यता नाकारता येत नाही.” असंही अद्वेत मेहता सांगतात.
 
भाजपचं ‘मिशन’ बारामती
पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग भाजपनं आतापासूनच फुंकलं आहे.
 
भाजपने देशभरातील काही लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्याचं समजतं. यात महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे मतदारसंघ असून बारमतीचाही यात समावेश आहे.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले होते, “मुळावर घाव घाला.”
 
यानंतर गेल्यावर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही बारामतीत दौरा केला. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे या मतदारसंघाचे प्रभारी आहेत. अमेठीप्रमाणे बारामतीतही लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजून लागेल असं विधान राम शिंदे यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याची माहिती देत असताना केलं होतं.
 
तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही बारामती दौऱ्यावर असताना '2024 मध्ये बारामतीमध्ये घड्याळ थांबेल' असं विधान करून राष्ट्रवादीला इशारा दिला होता.
 
हिंदुस्थान टाईम्सचे पुणे ब्युरो चीफ जोशी सांगतात, “भाजपकडूनही बारामतीसाठी आग्रह होत असल्याचं समजतं. पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आहेत. पुणे शहर भाजपकडे आहे. मावळ शिवसेनेकडे आहे. शिरुर शरद पवार गटाकडे आहे. भाजपने बारामतीत उमेदवार दिला तर तो निवडून येण्याची शक्यता कमी असते. यामुळे बारामती हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे ते देऊ शकतात आणि अजित पवार यांच्या कुटुंबातूनच कोणाला तरी उमेदवारी द्यायची अशीही रणनिती असल्याचं समजतं. यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगू शकतो.”
 
ते पुढे सांगतात, “भाजपला असं वाटतं की बारामतीत ताकद लावली तर ही सीट त्यांना मिळू शकते. सुप्रिया सुळे यांना मदत करणारे बऱ्याबैकी नेते भाजपच्याबाजूने आले आहे. पवारांचं राजकारण संपवायचं असेल तर थेट बारामतीतच त्यांचा पराभव करणं हे लक्ष्य असू शकतं. शरद पवार बारामती या मॉडेलचं कायम उदाहरण देत असतात आणि तिकडे त्यांचं कामही आहे. म्हणून जर बारामतीची जागाच राखता आली नाही तर शरद पवार यांच्या गटासाठी तो मोठा धक्का असेल,”
 
परंतु भाजप केवळ निवडणूक येण्यापूर्वीच बारामतीत लक्ष देते, नाहीतर बारामतीत भाजपची संघटनात्मक ताकद नाही असं ज्येष्ठ पत्रकार अद्वेत मेहता सांगतात.
 
ते सांगतात, “भाजपचे नेते कायम म्हणतात आम्ही 48 पैकी 45 जागा जिंकू. उर्वरित तीन जागा कुठल्या असतात? यापैकी एक जागा ही बारामतीची असते. भाजपचे केंद्रीय मंत्री बारामतीचा दौरा करत असले तरी बारामतीत भाजपची संघटनात्मक ताकद तितकीशी नाही किंवा ते केवळ निवडणुकीपुरतं बारामतीकडे पाहतात असं आजपर्यंत दिसून आलं आहे. गेल्यावेळेस 2019 मध्ये नरेंद्र मोदी सभेला आले नाहीत. अमित शहा यांनी सभा घेतली. तसंच शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातही सामंजस्य असल्याचं दिसून आलं आहे.”
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महाराष्ट्रात आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बदललेल्या राजकीय समीकरणानांनुसार प्रत्येक पक्ष आपआपल्या मतदारसंघाचा आढावा घेत आहे. लोकसभा मतदारासंघासाठीच्या पक्षांच्या बैठकाही सुरू आहेत.
 
आता बारामतीबाबतीत अजित पवार आपली किती ताकद लावतात की कुटुंबाचा विषय असल्याने ते अलिप्त राहणं पसंत करतात हे पहावं लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rashmi Shukla रश्मी शुक्ला राज्याच्या पोलिस महासंचालक!