नाशिक : प्रतिनिधी
कोकणातील बारसू येथे रिफायनीच्या सर्वेक्षणावरुन स्थानिक ग्रामस्थांनी यास कडाडून विरोध केला आहे. शेकडोच्या संख्येने पुरुष व महिला ग्रामस्थ घटनास्थळावर दाखल आहेत. सर्वेक्षणाला त्यांचा विरोध आहे. यावरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक बाबींच उलगडा केला आहे. ते बुधवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, रिफायनरीच्या कामात राजकारण केले जात आहे. थेट जालियनवाला बागशी तुलना केली जात आहेत. मात्र, वस्तुस्थिती काय आहे पहायला हवे. प्रत्यक्षात बारसू येथे रिफायनरीचा प्रकल्प व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. बारसु मध्ये १३०० एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो असे पत्र लिहिले होते. आणि आता तेच सरकारवर आरोप करीत आहेत. हे राजकारणच असल्याचा टोला सामंत यांनी यावेळी लागावला.
सामंत पुढे म्हणाले की, समृध्दी महामार्गाच्या भूसंपादना बाबतीतही तेच होत होते. केवळ राजकारण केले गेले. अखेर आम्ही हा महामार्ग तडीस नेला. राज्याला त्याचा फायदा होतोय. उद्धव ठाकरेंच्या पत्रामुळेच बारसुमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. सेना भवनवर एक पत्रकार परिषद झाली होती. त्यात रिफायनरी आम्ही आणली त्याचे श्रेय सरकारने घेऊ नये असे म्हटले होते. आता यात राजकारण का, असा प्रश्नही सामंत यांनी विचारला.
सामंत म्हणाले की, आता विरोध का होतोय याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. दुटप्पी राजकारण बंद झाले पाहिजे. विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. उद्योग बाहेर गेले म्हणून सांगणारे आता उद्योग येत असताना विरोध का करतात, याचे उत्तर दिले पाहिजे. पत्र लिहण्यावर आक्षेप नाही, पण हे तर पत्रकार परिषद घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी सारे काही करताय, असा आरोप सामंत यांनी केला.
बारसूच्या सर्वेक्षणाबाबत शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांंशी चर्चा करु त्यानंतर आपल्याला कळविले जाईल, असे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रद्द केला याचे उत्तर ठाकरे यांनी दिले पाहिजे, असे सामंत म्हणाले. बारसूमध्ये सध्या माती परीक्षण केले जात आहे. प्रकल्प करण्यासाठी जागा योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर प्रकल्प करायचा की नाही हे ठरवू, असे सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढवली जाणार असून पुढील दीड वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच कायम राहणार असल्याचे सामंतांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor