विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे मजूर आहेत का, असा प्रश्न सहकार विभागाने एका नोटिशीमार्फत विचारला आहे.
आमदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना मासिक अडीच लाख मानधन तसंच भत्ते मिळतात, निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपण व्यावसायिक असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
ही बाब लक्षात घेता आपल्याला मजूर म्हणून अपात्र का करू नये, अशा आशयाची नोटीस विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना बजावली आहे.
मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर संस्था या गटातून अर्ज दाखल केला होता. बिनविरोध म्हणून ते या गटातून निवडूनही येणार आहेत. पण दरम्यान, त्यांच्या मजूर असण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्याला दरेकर कशा पद्धतीने उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.