Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे :अध्यक्ष मीच ,कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरविणार : शरद पवार

पुणे :अध्यक्ष मीच ,कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरविणार : शरद पवार
, मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (08:02 IST)
मी 38 वर्षांचा असताना वसंतदादा पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका हे बंड नव्हतेच. यशवंतराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊन, सर्वांनी एकत्रित निर्णय घेतला होता. त्यासंबंधी आज तक्रार करण्याचे काही कारण नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. तसेच आज कुणी काही केले त्याचीही मला तक्रार करायची नाही, असेही पवार म्हणाले.
 
पवार यांनी सोमवारी भीमथडी जत्रेला भेट दिली. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या कोणी काय केले, यावर मला बोलायचे नाही, असे सांगत फक्त लोकांनी ज्या पक्षाला शक्ती दिली, त्याचा संस्थापक कोण आहे? या सर्व गोष्टी सर्वांच्या समोर आहेतच. त्यामुळे यावर मला अधिक चर्चा करायची नाही, असेही शरद पवार म्हणाले. बारामतीमध्ये मागील दहा वर्षात माझे कोणत्याही कामात लक्ष नाही. येथील स्थानिक निवडणुका, साखर कारखाने, शैक्षणिक संस्थांबाबत मी निर्णय घेतलेले नाहीत. या क्षेत्रात कुणी काम करावे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. सर्वांना बरोबर घेऊन केवळ या भागाचा विकास व्हावा, ही माझी इच्छा आहे. राज्यातील नवख्या तरुणांना मी कायमच प्रोत्साहन देतो, असे शरद पवार म्हणाले.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची हे मीच ठरवेन, असेही शरद पवार म्हणाले. आता सत्तेत असणारे नेते अनेक वर्ष शरद पवारांमुळे सत्तेत होते. केवळ कारवाईच्या भीतीपोटी हे लोक भाजपसोबत गेले आहेत. मात्र, भविष्यात यांचेच खच्चीकरण होणार आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला.
 
कारवाईच्या भीतीपोटी
काही लोक सत्तेत आपल्यावर कारवाई होईल, म्हणून काही लोक सत्तेत गेले. भाजपबरोबर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाजपची क्रीप्ट वाचावीच लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जे झाले, तेच आता अजित पवार यांच्याही बाबतीत होत आहे. भाजपला पवार परवडणारे नाहीत. टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. आता पवारविरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केली.

Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वसईचा किल्ला : इथे पोर्तुगीजांनी वसवलेलं युरोपियन शहर, चिमाजी अप्पांनी त्यांना कसं हरवलं?