Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वसईचा किल्ला : इथे पोर्तुगीजांनी वसवलेलं युरोपियन शहर, चिमाजी अप्पांनी त्यांना कसं हरवलं?

Koraigad Fort
Vasai Fort: सुमारे 450-500 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक युरोपीय पद्धतीचं शहर होतं. तिथं अधिकारी-सैनिकांची घरं होती, चर्चेस होती, हॉस्पिटल, बाजारपेठ, न्यायालय, नगरपालिका, कॉलेजेस, विहिरी, बांधलेले रस्ते, हॉटेल्स, सांडपाण्याची व्यवस्था होती असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का?
 
पण हे खरंच महाराष्ट्रात मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर एक शहर होतं. अनेक उंचच इमारती आणि वर्दळीनं भरलेलं हे शहर थेट वसईच्या किल्ल्यातच होतं.
 
पोर्तुगीजांनी 1536 साली हे शहर वसवलं आणि ही सगळी बांधकामं केली होती. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि भारतातील किल्ल्यांवर प्रेम असणाऱ्या व्यक्तीला वसई हे नाव माहिती नसणं विरळाच. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या वसईचा किल्ला गेल्या चारशेहून अधिक वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे.
 
वसईचा किल्ला हा व्यापाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी भारतात किती बळकटपणे पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उखडून टाकण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याचं उदाहरण म्हणावं लागेल.
 
वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच त्याहून वसईची मोहीम, वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं.
 
हे स्थान पोर्तुगीजांच्या महाराष्ट्रातल्या कोर्लई, चौलसारख्या किल्ल्यांना मिळालेलं नाही. त्यामुळेच वसईच्या दिग्विजयाची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे.
 
वसई आहे कुठं?
वसई हे शहर मुंबईपासून उत्तरेस साधारण 50 किमी अंतरावर आहे. एकेकाळी ठाणे जिल्ह्यात असणारं हे शहर आता पालघर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्याला ब्रिटिश काळात बॅसिन, बेसिन अशा नावानं ओळखलं जात होतं.
 
विरार या जोडशहराबरोबर असलेल्या महानगरपालिकेमुळे वसई-विरार असं जोडनाव या परिसराला दिलं गेलं आहे. वेगानं वाढत जाणारं आणि मुंबईच्या आसपासच्या ज्या लहान शहरांमधून मुंबईत दररोज प्रवास करून कामाला जातात त्यामध्ये वसईचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं.
 
वसईचा किल्ला
वसईच्या किल्ल्याची माहिती घेताना पोर्तुगीजांनी इथं कसे पाय रोवले याची माहिती घेणं आवश्यक आहे. पोर्तुगीजांच्या भारतातील उत्तरेतील प्रांताचं नाव प्रोविन्सिया दो नोर्टे असं होतं.
 
यामध्ये उत्तरेस दमण ते दक्षिणेस करंजा असा साधारण 200 किलोमीटरचा प्रांत येत होता. त्यात दीव बेट आणि चौलही येत होते. हा भाग त्यापूर्वी गुजरात आणि अहमदनगरच्या (अहमदनगरची निजामशाही) राज्यात होता.
 
या त्यांच्या प्रांताची वसई ही राजधानी होती. गुजरातच्या सुलतानाने मुघलांशी लढण्यासाठी मदत मागताना वसईचा ताबा पोर्तुगीजांना दिला आणि इथं पोर्तुगीजांनी दीर्घकाळ आपला ताबा ठेवला.
 
वसईच्या किल्ल्याचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्यामते मात्र या किल्ल्याचा असा गुजरातच्या सुलतानाचा थेट संबंध असल्याचा पुरावा सापडत नाही.
 
ते सांगतात, “हा किल्ला 12 व्या शतकात भोंगळे राजांनी बांधला असे उल्लेख आणि पुरावे सापडतात. त्यावेळेस बालेकिल्ला आणि काही बांधकामं झाली होती, ती आजही दिसून येतात.”
 
गुजरातच्या सुलतानाच्या काळात झालेलं थोडंफार बांधकाम पोर्तुगीजांच्या काळात वेगानं वाढलं. किल्ल्याला आतून बाहेरून रुप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकामांना सुरुवात झाली.
 
आतमध्ये बालेकिल्ला, चर्चेस, इमारती, राहाण्याच्या जागा, बाहेर बुरुज असलेली मोठी तटबंदी असं बांधकाम पोर्तुगीजांनी वेगानं करायला सुरुवात केली.
 
वसईच्या किल्ल्याचा प्रदेश एखाद्या बेटासारखा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. दक्षिण आणि नैऋत्येला उल्हास नदी ज्याला वसईची खाडी असंही म्हटलं जातं. आणि त्याचाच एक फाटा पूर्वेला होता. तो सर्व भाग आता गाळाने भरलेला दिसून येतो. अशाप्रकारे जमिनिशी जोडलेला पण पाण्याने वेढलेला या किल्ल्यात पोर्तुगीजांनी एका शहरासारखी व्यवस्था तयार केली होती.
 
त्यांनी 1536 पासून 1739 पर्यंत किल्ल्यावर घट्ट पकड ठेवली आणि त्यानंतर तो मराठी साम्राज्यात सामील झाला.
 
किल्ल्याची रचना
या किल्ल्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बुरुज असलेली याची भक्कम तटबंदी. या किल्ल्याला दोन दरवाजे असून त्यातला एक दरवाजा मुख्य भूमीच्या दिशेने आणि दुसरा खाडीच्या दिशेने उघडतो. साओ सेबेस्टिओ, साओ पाअलो, साओ पेद्रो, सेंट फ्रान्सिस झेवियर अशा प्रकारचे अनेक बुरुज या किल्ल्याच्या कोटाला आहेत.
 
या किल्ल्यात तीन चर्चेस आणि जेसुईटांच्या अध्ययनासाठी कॉलेजही होतं. आतमध्ये रस्ते आणि वस्त्यांची विशेष रचना करण्यात आली होती. किल्ल्यातच एक तुरुंग आणि कोर्टही होतं.
 
या किल्ल्यात बाजारपेठ वसवण्यात आली होती तसेच वज्रेश्वरी मंदिरही आहे. पेशव्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर बुरुजांची नावं बदलण्यात आली होती.
 
यशवंत, कल्याण, भवानी मार्तंड, वेताळ, दर्या अशी बुरुजांची नावं ठेवण्यात आली होती. अशाप्रकारे वसई किल्ला हे बालेकिल्ल्याच्या भोवती वसलेलं एक शहरच तयार झालं होतं.
 
पोर्तुगीजांच्या काळात याच्या बालेकिल्ल्याला 'फोर्टे दे साओ सेबॅस्टिओ' असं नाव होतं.
 
ही जागा किल्ल्याच्या साधारण मध्यभागी आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या तटबंदीवर असलेल्या 10 बुरुजांद्वारे किल्ल्याचं रक्षण होत असे.
 
किल्ल्याची माहिती देताना इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत सांगतात, “हा किल्ला मिश्रदुर्ग प्रकारात येतो, साधारणतः 110 एकर इतका त्याचा परिसर आहे. याच्या तीन बाजूंना पाणी आणि एका बाजूला दलदल आहे.
 
महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांतील अवशेष भूईसपाट झाले आहेत मात्र या किल्ल्यातील अवशेष आजही आहेत. इथली युरोपियन धाटणीच्या इमारती हे त्याचं वैशिष्ट्य आहे."
 
वसई प्राचीन आहे. तिचा उल्लेख 8 व्या ते 10 व्या शतकापासून सापडतात. इथं नागवंशीय लोक, राष्ट्रकूट, कोकण मौर्य, त्रैकूट, शिलाहार, पोर्तुगीज, मराठे, ब्रिटिश अशा राजवटी इथं होत्या.
 
भोंगळे राजांनी 12 व्या शतकात इथं गढी बांधली होती. पुढे गुजरातच्या सुलतानाचा सरदार मलिक तुघान इथं राहात असताना तो ताब्यात घेतला होता.
 
वसईचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला नाही तर त्यांनी याचा विकास केला आहे. 1536 ते 1600 अशी बांधणी ते करत होते. साधारणतः किल्ला बांधून लोक राहायला येतात पण वसईत आधी लोक राहायला आले, त्यांनी प्लॅनिंग केलं आणि शहर वसवलं. आजही तेव्हाचे रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, वास्तू दिसतात.”
 
मराठा पोर्तुगीज तंटा
पश्चिम किनाऱ्यावर त्यावेळेस इंग्रजांबरोबर पोर्तुगीज अत्यंत बलवान आणि लढवय्या ताकद मानली जात होती. त्यांच्याशी सततचे खटके उडण्याची वेळ येतच होती.
 
मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात पहिला मोठा तंटा 1719-20 साली मराठ्यांनी कल्याण जिंकल्यावर झाला. त्यानंतर 1737 साली मराठ्यांनी ठाण्याचा किल्ला जिंकला आणि एकप्रकारे वसई मोहिमेला सुरुवातच झाली.
 
1739 साली वसई मराठ्यांनी ताब्यात घेतल्यावर मात्र या पोर्तुगीजांच्या उत्तर प्रांतातली सद्दी कमी झाली.
 
वसईच्या मोहिमेचं नेृतृत्व करणाऱ्या चिमाजी अप्पाचं कौतुक पोर्तुगीजांनीच केलं. या मोहिमेमुळे आपण वसईचा प्रांत गमावला नाही तर लोकांचा विश्वास आणि राजकारणातलं स्थान गमावल्याची कबुली पोर्तुगीजांनी दिली.
 
चिमाजी अप्पा
चिमाजी अप्पा हे बाळाजी विश्वनाथांचे पुत्र आणि पहिल्या बाजीरावांचे भाऊ. त्यांचा जन्म 1707 साली झाला असावा. चिमाजी अप्पा लहान वयातच असताना त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पेशवाईची जबाबदारी पहिले बाजीराव यांच्यावर आली
 
चिमाजी अप्पाही लवकरच त्यांच्या मदतीला सिद्ध झाले. चिमाजींच्या पहिल्या पत्नीचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्यापासून चिमाजी अप्पांना सदाशिव हे पुत्र होते.
 
हेच पुढे पानिपतच्या युद्धात सदाशिवराभाऊ किंवा भाऊसाहेब म्हणून ओळखले गेले. रखमाबाईंच्या मृत्यूनंतर चिमाजी यांनी अन्नपूर्णाबाई यांच्याशी विवाह केला.
 
 
सुरुवातीच्या काळात चिमाजी डभई, ग्वाल्हेर मोहिमांमध्ये भाग घेतल्यानंतर ते कोकणात सिद्दी आणि पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायला आले
 
सिद्दीच्या ताब्यात कोकणातील अनेक ठाणी होती. अप्पांनी या मोहिमेत सिद्दीसादला मारुन अंजनवेल, गोवळकोटपासून रेवसपर्यंत अनेक ठिकाणं ताब्यात घेतली होती.
 
वसईची मोहीम
 
सिद्दीच्या बंदोबस्तानंतर मराठे पोर्तुगीजांकडे वळले. पोर्तुगीजांनी आपल्या प्रांतात अत्यंत कडक कायदे बनवले होते.
 
त्यामुळे हिंदूवर होत असलेल्या अत्याचारांचं उच्चाटन करावं अशा तक्रारी पेशव्यांकडे येत होत्या. त्यातही साष्टी बेटात होत असलेल्या अत्याचारांना उत्तर देण्यासाठी पिलाजी जाधव यांना पाठवण्यात आलं होतं. त्यांना मालाडचे देसाई अंताजी कावळे, कल्याणजवळी अणजूरचे गंगाजी नाईक यांनी मदत केली होती. मात्र साष्टी मराठ्यांच्या ताब्यात जातेय हे लक्षात आल्यावर पोर्तुगीजांच्या मदतीला इंग्रज आले.
 
त्यांनी मदत केल्यामुळे तह करुन ही चाल थांबवण्यात आली.
1734 पासून पोर्तुगीजांना ठाण्यात किल्ल्याचा कोट बांधायला सुरुवात केली.
 
पेशव्यांचं या हालचालीकडे लक्ष होतंच. 1737च्या मार्च महिन्यात चिमाजी अप्पा पोर्तुगीजांच्या स्वारीवर बाहेर पडले.
 
ते बदलापूरला पोहोचले तोपर्यंत अणजूरचे नाईक, शंकराजी फडके यांनी ठाण्यापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर अचानक छापा टाकून मराठी सैन्याने ठाणं जिंकून घेतलं.
 
पोर्तुगीजांना तिथून पळूनच जावं लागलं. त्यानंतर मरोळ, मालाड, तुर्भे अशी एकेक ठिकाणं जिंकून घ्यायला सुरुवात केली मात्र वांद्रे आणि वेसावे (वर्सोवा) ही ठिकाणं त्यांच्या ताब्यात आली नाहीत.
 
त्यानंतर सर्व प्रदेशाची व्यवस्था लावून अप्पा पुण्याला परतले, त्यानंतरही वसई घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरूच राहिले.
 
वसई जिंकायची झाली तर तिच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकायला हवा हे ताडून मराठ्यांनी तारापूर, डहाणू, नारगोळ, माहीम, केळवे, शिरगाव, खत्तलवाड, अशेरी ही ठाणी जिंकून घेतली. अशी आजूबाजूला धामधूम सुरू असताना चिमाजी अप्पांनी 1739 साली मे महिन्यात वसईवर हल्ला केला.
 
वसई किल्ल्याच्या एकेक बुरुजाला सुरुंगांनी लक्ष्य करायला सुरुवात झाल्यावर पोर्तुगीजांनी लढाई थांबवून तहाची बोलणी करावी असं सांगितलं.
 
तह करुन किल्ला मोकळा करुन ताब्यात देतो अशी बोलणी करायला पोर्तुगीजांचे वकील पांढरं निशाण घेऊन किल्ल्याबाहेर आले आणि वसईच्या किल्ल्यासाठी तह करण्यात आला. त्यात 12 कलमं होती.
 
पोर्तुगीज आणि त्यांचे लोक यांना सुरक्षितपणे जाऊ द्यावे तसेच त्यांना आपली मालमत्ता घेऊन जाता यावी अशी अनेक कलमं होती. तसेच किल्ल्यातला दाणागोटा आणि दारुगोळाही नेण्याची परवानगी मागितली होती. पण चिमाजी अप्पांनी ती विकत घेतली.
 
वसई परिसरात लोकांना आपापलं धर्माचरण करू द्यावं तसेच चर्चना धक्का लावू नये अशी अट घालण्यात आली. पोर्तुगीज गलबतात बसून तोफेच्या टप्प्याच्या बाहेर जाईपर्यंत मराठ्यांनी फौज किल्ल्यात आणू नये असंही यात नमूद करण्यात आलं होतं.
 
किल्ल्यातल्या ख्रिस्ती धर्मगुरूंनाही सुरक्षित जाऊ देण्याची विनंती करण्यात आली. या सर्व अटींचं पालन मराठ्यांतर्फे करण्यात आलं.
 
वसईच्या या मोहीमेमुळे पोर्तुगीजांची त्यांच्या उत्तर प्रांतातली सद्दी कायमची संपवण्यास मराठ्यांना यश आलं. या मोहिमेचं कौतुक झालंच त्याहून चिमाजींच्या मार्गदर्शनाचं आणि नेतृत्त्वाचं विशेष कौतुक त्या काळात झालं.
 
वसईच्या मोहिमेबद्दल श्रीदत्त राऊत सांगतात, “भारतात आलेल्या युरोपीय सत्तेचा भारतात पहिला पाडाव वसईत झाला ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. 205 वर्षांचं पोर्तुगीजांचं साम्राज्य वसईत पराभूत झालं. वसईच्या मोहिमेची कागदोपत्री नोंद पाहिली तर प्रचंड प्रमाणात झालेली वित्तहानी, मनुष्यहानी हे एक त्याचं वैशिष्ट्य होतं. मात्र 26 मार्च 1637ला ती सुरू झाली आणि 16 मे 1639ला ती संपली.
 
मराठ्यांनी साम्राज्याप्रती दाखवलेली निष्ठा यात दिसून येते. तो किल्ला पाण्यात होता हे विसरुन चालणार नाही. ही मोहीम फक्त वसईची नव्हती तर ती उत्तर कोकणची होती. ठाण्याचा किल्ला घेऊन तिची सुरुवात झाली आणि वसईचा किल्ला घेऊन ती थंडावली किंवा नंतर रेवदंड्याला त्याचा समारोप झाला असं म्हणता येईल. 27 महिने ती मोहीम सुरू होती.
 
या मोहिमेत उत्तर कोकणातले 100 तरी किल्ले या मोहिमेच्या संदर्भात आहेत. त्यावर मराठ्यांनी विजय मिळवला. या मोहिमेत गुप्तहेर खात्यानं कसं काम केलं याचा आजही पूर्ण थांग लागलेला नाही. पेशव्यांचे सर्व महत्त्वाचे सरदार यात होते. 300 सरदारांची नावं यात दिसून येतील. मराठ्यांनी या मोहिमेत प्रत्येक लढाईत मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी अगदी सहज लावलेली दिसून येते.”
 
आजची स्थिती
मराठ्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर 1739 पासून मराठा साम्राज्य असेपर्यंत म्हणजे 1818 पर्यंत किल्ल्यावर त्यांचंच राज्य होतं. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात त्याकडे फार लक्ष देण्यात आलं नाही. इंग्रजांनी किल्ला भाडेतत्वाने कारखान्यासाठी दिला. मात्र या काळात पडझड सुरूच राहिली. पोर्तुगीजांच्या काळात मोठ्या प्रमाणात इथं बांधकामं झाल्यामुळे एवढी पडझड होऊनही या इमारतींचे अवशेष दिसून येतात.
 
ब्रिटिशांनी लिटिलवूड नावाच्या व्यक्तीला साखरेच्या कारखान्यासाठी हा किल्ला दिला. मात्र अपेक्षित पैसा न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या लिटिलवूडने किल्ल्यातले दगड विकून पैसे उभारायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत मोठी बांधकामं होत होती. या बांधकामांसाठीही किल्ल्याचे दगड वापरले गेले.
 
मराठ्यांची भीती आणि खंदक
ब्रिटिशांचे सर्व व्यवहार मुंबईच्या फोर्टमध्येच होत असे. या फोर्टभोवती त्यांनी तटबंदी बांधली होती आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्री, किंग्ज, चर्च, मूर, रॉयल असे बुरुजही बांधले होते. परंतु अजुनही ब्रिटिशांना पुरेसं सुरक्षित वाटत नव्हतं. याला आणखी एक कारण झालं ते म्हणजे मराठ्यांची वसईची मोहीम.
 
मराठ्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करुन वसई ताब्यात घेतल्यावर ब्रिटिशांना त्यांची धास्ती वाटू लागली. मुंबईच्या उंबरठ्यावर मराठे आल्याचं पाहून ब्रिटिशांनी आता संरक्षणासाठी काहीतरी करायला हवं याचा विचार सुरू केला. वसईनंतर मराठे वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत दक्षिणेस सरकले होते.
 
त्यामुळे कंपनीने सर्वांत आधी कॅ. जेम्स इंचबर्डला चिमाजीअप्पांची भेट घेण्यासाठी वसईला पाठवण्यात आले. चिमाजी अप्पांनी सांगितलेल्या 15 अटी घेऊन इंचबर्ड मुंबईला परतला असे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी 'मराठी रियासत'च्या तिसऱ्या खंडात लिहून ठेवले आहे.
 
त्यानंतर कॅप्टन गोर्डननेही साताऱ्याला जाऊन छ. शाहू महाराजांची भेट घेतली. इंचबर्ड आणि पहिले बाजीराव यांचीही पुण्यात भेट झाली. पण ब्रिटिशांच्या मनातली भीती कमी झाली नाही. त्यांनी मुंबई फोर्टभोवती खंदक खणायला घेतला. तेव्हाच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या खंदकासाठी पैसे उभे केले. ही रक्कम 30 हजार इतकी हती. खंदक खणायला एकूण खर्च 2.5 लाख इतका झाला. मुंबईतले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे ते पहिले प्रकरण असावे.
 















Published By- Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नैराश्याने त्रस्त अभिनेता अपूर्व शुक्ला चे निधन