Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे रिंगरोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश

पुणे रिंगरोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पुणे रिंगरोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत यावेळी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
 
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचे सचिव युधविरसिंह मल्लीक आणि केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी  उपस्थित होते .
 
पुणे रिंगरोडच्या कामाला गती येणार-मंत्री गिरीष बापट पुणे रिंगरोडचे काम टप्प्या-टप्प्याने करण्याच्या सूचना देत या संदर्भातील सादरीकरण करण्याचे आदेश श्री. गडकरी यांनी या बैठकीत दिले असून यामुळे रिंगरोडच्या कामाला गती येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी बैठकी नंतर दिली.
 
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे शहाराच्या परिसरात 132 कि.मी. चा बारा पदरी रिंगरोड बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्विस रोड बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रिंगरोडच्या माध्यमातून वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच सातारा व अहमदनगर हे राष्ट्रीय महामार्ग पुण्यात न येता परस्पर शहराबाहेरच जोडण्यात येणार आहेत.  रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 3 हजार 675 कोटींचा खर्च होणार आहे. तर रिंगरोडच्या बांधकामासाठी 1 हजार 900 कोटींचा खर्च येणार आहे यासाठी केंद्र शासनाच्या ‘भारतमाला’ प्रकल्पातून किंवा ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या’ माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली. यास सकारात्मकता दर्शवत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे रिंगरोडचे काम टप्प्या-टप्प्याने करण्याच्या सूचना देत या संदर्भातील सादरीकरण करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे रिंगरोडच्या कामाला गती मिळेल असा विश्वास श्री. बापट यांनी व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईच्या ट्राफिकचा अजितदादांना फटका, लोकलमध्ये विंडो सीट