अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातल्या बहुतांश भागाला बसला आहे. या पावसामुळे शेतीपिकांचं नुकसान झालं आहे.हवामान विभागानं पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यातल्या बहुतांश भागात सध्याही ढगाळ वातावरण आहे.मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात ज्वारी, हरभरा, तूर, कापूस या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळे शेतातील कापसाची बोंडं खाली गळून पडली आहेत. वेचणीला आलेला कापसाची पावसामुळे दाणादाण उडाली आहे.रबी हंगामातील ज्वारी, गहू पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हुरडा ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं.पण रविवार रात्रीच्या पावसामुळे ज्वारीची कणसं मातीत मिसळली आहेत.पावसानं ज्वारीचं पूर्ण नुकसान केलंय.
राज्यात ठाणे, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात येत्या 3 दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टीलगतच्या भागात चक्रीवादळ स्वरूपात वारे घोंगावत असल्यामुळे मुंबई व किनारपट्टीलगतच्या भागात पावसाचे ढग निर्माण होत आहे. हे वारे राज्याच्या दिशेने पुढे जात आहे त्यामुळे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याच्या किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे वाढेल. त्यामुळे नोव्हेंबर मध्ये होवल्यात पावसाचा अनुभव घ्यावा लागणार आहे.