गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. राज्यात एकूण या ठिकाणी NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड शहरामध्ये पुराचा पाणी शिरलं आहे. भरती आणि अतिवृष्टीची वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली. अनेक लोक अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत. चिपळूण नगरपालिकेच्या 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले?
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. या भागातील परिस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि इतर विभागांना तातडीने बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसंच नद्यांच्या पातळीत वाढ होत असल्याने स्थानिकांनी खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोव्हिड रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले.
या बैठकीत नद्यांच्या पातळीची परिस्थिती सुद्धा सांगण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 9 मीटरवरुन वाहते आहे.
वशिष्ठी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटरवरुन वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटरवरुन वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या भागातील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातही कुंडलिका नदीनेही धोका पातळी ओलांडल्याने पूरजन्य परिस्थिथी आहे. रत्नागिरीमधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवल्या आहेत.
'आतापर्यंतचा सर्वात भयानक पूर'
पुण्यातून NDRF च्या दोन टीम पुणे ( खेड साठी 1 व चिपळूण साठी 1)येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत.
आतापर्यंतचा हा सर्वाधिक भयानक पूर असल्याचं चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "NDRF आणि इतर सुरक्षा पथकं पोहचत आहेत. नगरपालिकेच्या बोटी आता पोहचत आहे. वीज नाहीय. अनेर रुग्ण रुग्णालयात अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी कमी होण्याची गरज आहे.
तर दुसऱ्या बाजूला पाऊस आणि पाण्याची पातळी अधिक असल्याने NDRF पथकांना पोहचण्यास विलंब होत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे, याबद्दलची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
'पूर्व तयारी का केली नाही?'
रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा तडाखा बसू शकतो असा इशारा देण्यात आला होता तरीही प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली नाही अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, "कोकणात सलग मुसळधार होणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली होती. तसंच पूर्वीप्रमाणे परिस्थिती उद्भवू शकते, लोक पाण्यात अडकू शकतात अशी शक्यता असून सुद्धा तयारी करण्यात आली नाही. NDRF चे काही बेसकॅम्प कोकणात असावेत अशी आम्ही मागणी केली होती. त्याची दखल घेण्यात आली नाही."
कोल्हापूरमध्ये पाण्याची पातळी वाढली
कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली असून अनेक सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे.
अलमट्टी धरणातून 97 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पूरपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे. पंचगंगा नदीकाठच्या काही भागात स्थलांतरला सुरुवात झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तसेच 77 बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून NDRFला पाचारण करण्यात आले असून दुपारपर्यंत पथक जिल्ह्यात दाखल होणार आहे.
कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर पाणी आल्याने अनेक मार्ग बंद करावे लागले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण, बदलापूर इथे उल्हास नदीचं पाणी शहरात शिरण्यास सुरुवात झाली.
उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वांगणी - बदलापूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आलं असून इथली रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. कर्जतमध्ये रस्त्यावर आणि घरांमध्ये उल्हास नदीचं पाणी शिरायला लागलंय.
इथे अनेक ठिकाणी इमारतींमधली वाहनं पूर्णतः पाण्यात गेलीयत. तर, कल्याण जवळच्या खाडीतलं पाणी वाढल्याने स्थानिक म्हशीच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरलं. यामुळे सगळ्याच म्हशींना रस्त्यावर आणावं लागलंय.
अकोला जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान
काल अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळं शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर खडकी भागातील न्यू खेताण या परिसरातील 30 घरं पाण्याखाली आले आहे.
स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात 202.9 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. शेतांमध्ये पाणी साचले आहे, शेती खरडून निघाली आहे.
पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील बत्ती गुल आहे. काल रात्रीपासून बचाव पथक तैनात आहे. तर नागपूरहून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
संततधार पावसाने नांदेडच्या सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झालं आहे. सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे.
त्यामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहतेय, त्यामुळे सहस्रकुंड धबधब्याचे असे दुर्मिळ दृश्य आज सकाळपासून पाहायला मिळत आहे.