Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे: धनुष्यबाण एकाला पेलवलं नाही, दुसऱ्याला पेलवणार का?

raj thackeray
, बुधवार, 22 मार्च 2023 (21:36 IST)
social media
बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिवधनुष्य होतं. धनुष्यबाण एकाला पेलवलं नाही, पण दुसऱ्याला ते पेलवणार का, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
 
राज ठाकरे यांची आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळावा पार पडला.
 
"काही जणांनी सांगितलं होतं की संपलेला पक्ष आहे. गर्दी दाखवून - म्हणाले हा संपलेला पक्ष आहे का. जे बोलले त्यांची अवस्था आज काय आहे"? असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.
 
शिवसेना आणि धनुष्यबाण हे जेव्हा तुझं की माझं सुरू होतं त्यावेळी वेदना होत होत्या असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "लहानपणापासून पक्ष पाहत आलोय. तो पक्ष जगलो. मला आजही आठवतय की माझ्या शर्टावर वाघ असायचा. राजकारण लहानपणापासून पाहत आलो. बाळासाहेबांसोबत होतो. असंख्य लोकांच्या मेहनतीने उभी राहिलेली संघटना. मी बाहेर पडलो त्यावेळी इथे माझं भाषण झालं होतं. माझा वाद हा विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे".
 
ही चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार असं मी म्हटलं होतं. त्यावेळी त्यात वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून मी बाहेर पडलो असं त्यांनी सांगितलं.
 
मला पक्षप्रमुखपद नको होतं
"2006 ला मी पक्ष स्थापन केला. त्या संपूर्ण भाषणात मला का झालं, कसं झालं, हा चिखल मला करायचा नव्हता, आजही मला तो करायचा नाही. पण काही गोष्टी ज्या पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना पक्षप्रमुख पद पाहिजे होतं, सगळा पक्ष ताब्यात हवा होता, असं माझ्याबाबत म्हटलं गेलं. पण ते पद मला बिलकुल नको होतं. कारण तो केवळ धनुष्य नव्हता तर शिवधनुष्य होता. बाळासाहेबांशिवाय इतरांना ते पेलवेल की नाही, मला माहीत नव्हतं. एकाला तर पेलवलं नाही, दुसऱ्याला पेलवेल की नाही माहीत नाही", असं राज ठाकरे म्हणाले. सारखा तो महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. त्याआधी काय गोष्टी घडल्या हे मी सांगतो. म्हणजे आताची परिस्थिती का ओढावली हे तुम्हाला कळेल असंही त्यांनी सांगितलं.
 
त्यावेळी काय झालं होतं, हे सांगणं आता गरजेचं आहे. कारण आता जे काही सुरू आहे, ते तुम्हाला समजेल. मी एकेदिवशी उद्धवकडे गेलो, म्हणालो बाहेर जायचंय.बाहेर निघालो आणि हॉटेल ओबेरॉयकडे गेलो. तुला काय हवंय, बोल, असं मी त्याला म्हणालो. तुला अध्यक्ष व्हायचंय, उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय, ते तू हो. पण मला एवढंच सांग की माझं काम काय आहे.
 
राणे शिवसेनेबाहेर गेले नसते
"मला फक्त एरवी प्रचार करण्यासाठी बाहेर काढू नका. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही, त्यांना मी काय तोंड दाखवू?तेव्हा तो म्हणाला, "नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. मग आमचं ठरलं. आम्ही घरी आलो. बाळासाहेब ठाकरेंना आम्ही भेटलो. आमच्यात सगळं मिटल्याचं त्यांना सांगितलं. तेव्हा उद्धव ठाकरेंना बोलावलं, पण उद्धव ठाकरे आले नाहीत. पण, उद्धव ठाकरे तिथे आले नाहीत. हे सगळं लोक पक्षाच्या बाहेर कसे जातील, त्यासाठी सुरू होतं. नारायण राणेसुद्धा पक्षाबाहेर कधी गेलेच नसते", असं राज ठाकरे म्हणाले.
 
त्यांनी पुढे सांगितलं, "मी म्हटलं मी साहेबांशी बोलतो, तुम्ही जाऊ नका. राणे म्हणाले, बोला तुम्ही साहेबांशी.मी बाळासाहेबांना फोन लावला. राणेंची बाहेर जाण्याची इच्छा नसल्याचं त्यांना सांगितलं. बाळासाहेबांनी राणेंना घरी घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर मी राणेंना फोन लावून तत्काळ घरी येण्यास सांगितलं. ते तिथून निघाले आणि पुन्हा मला बाळासाहेबांचा फोन आला. तेव्हा ते मला म्हणाले, राणेंना बोलावू नकोस. त्यावेळी त्यांच्या मागे कुणीतरी बोलतोय, हे मला कळत होतं. बाळासाहेबांच्या फोननंतर मला पुन्हा राणेंना सांगावं लागलं की येऊ नका.ज्या प्रकारे संघटना चालवणं, लोकांना बाहेर काढणं आणि राजकारण सुरू होतं, त्या सगळ्याचा शेवट हा आहे".
 
सभा कसल्या घेताय, काम करा - एकनाथ शिंदेंना सल्ला
आतापर्यंत मला एवढच माहिती होतं की महाराज सुरत लूटून इकडे आले होते. महाराष्ट्रातून तिकडे गेलेले हे पहिलेच
 
एकनाथ शिंदे यांना एवढच सांगायचं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात तर काम करा. त्यांच्यामागे सभा घेत फिरू नका. त्यांनी वरळीला घेतली तुम्ही वरळीला, ते खेडला गेले तुम्ही पण गेलात. हे काय चाललंय.
 
जुनी पेन्शन, शेती याकडे लक्ष द्या. सगळीकडे सुशोभीकरण केलंय. पिवळे दिवे लावलेत. मुंबई आहे की डान्स बार कळत नाही
 
जगामध्ये जाता तुम्ही बघा किती स्वच्छ सुंदर शहर असतात. 1700 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी खर्च केलेत.
 
आपण कोण आहोत. महाराष्ट्राचे नागरिक आहोत. महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आज. हिंद प्रांतावर सगळी आक्रमणं बाहेरून आली आहे. इथे आपलं कोणी स्वत:च राज्य निर्माण केलं असेल तर ते छत्रपतींनी केलं. आज तोच महाराष्ट्र चाचपडतोय.
 
नवीन उद्योग येताना दिसत नाहीत. बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी, महीला, विद्यार्थी सरकारकडे बघतायत आणि सरकार कोर्टाकडे बघतंय की आमचं काय होणार. असं कोर्टावर अवलंबून राहिलेलं सरकार मी नाही पाहिलं
 
एकदाच काय ते होऊन जाऊ दे आणि मी तर म्हणतो विधानसभा लावा एकदाच काय ते होऊ देत.
 
'मला जावेद अख्तरसारखी माणसं पाहिजेत'
माझ्या हिंदुत्वात धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय. जो दुस-याच्या धर्माचाही मान राखेल. मला मुस्लीम लोकही हवी आहेत. जावेद अख्तर सारखी माणसं पाहिजे आहेत.
 
द्वेषाने पाहण्यासारखं काही नसतं पण जे खुरापती असतात त्यांनाही उत्तर दिलं पाहिजे. पाकिस्तानला दोन शब्द ऐकणारा पाहिजे.
 
हे सांगून राज ठाकरे यांनी जावेद अख्तर यांचा व्हिडिओ दाखवला.
 
सांगलीतील मुद्दा मांडला
 
मला पत्र आलं, मंगलमूर्ती काॅलनीत बहुतांश लोक हिंदू राहतात.
 
सदर काॅलीनीतील काही प्लाॅटवर काही लोकांनी हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. झुंडशाही केली.
 
आवाज करण्यास त्या लोकांनी सुरुवात केली(मुस्लीम लोकांची नावं घेतली) तिथे अनधिकृतपणे मशीद बांधली जात आहे. हे सांगलीत घडत आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी स्क्रिनवर काही फोटो दाखवले.
 
समुद्रातील कथित दर्ग्याचा व्हीडिओ दाखवला
सगळ्यांचंच राजकारणाकडे लक्ष आहे. मी मध्यंतरी या भागात एकाकडे गेलो होतो. त्यावेळी समुद्रात मला लोक दिसले. गर्दी होती. ड्रोनने माझ्याकडे एकाने क्लिप्स पाठवल्या. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यावर काय होतं हे यातून दिसतं. तुमच्या भागात तुम्ही दक्ष असलं पाहिजे. मी जे तुम्हाला दाखवणार हे तुम्हाला मान्य आहे का?
 
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आयुक्त चहल, मुंबई पोलीस आयुक्त फणसाळकर यांना विनंती आहे की यावर कारवाई होणार नसेल तर महिन्याभराने काय होईल हे पाहिल्यावर मी सांगतो
 
माहिमच्या खाडीत हिरवे झेंडे आणि मखदूम दर्गाजवळ नवीन दर्गा केला गेलाय. दोन महिन्यांपूर्वी हे केलंय. त्याआधीच्या सॅटेलाईट इमेजमध्ये हे काही नव्हतं.
 
हे जर तोडलं गेलं नाही तर याच्या बाजूला आम्ही सर्वात मोठं गणपती मंदिर आम्ही बांधणार. ह्या सवलती चालणार नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, मग आमच्याकडेही दुर्लक्ष करा.
 
हे राज्य माझ्या हातात आलं तर सुतासारखं ह्यांना सरळ करेन. ह्यांचं सगळं लक्ष राजकारणात आहे. माझी ताकद दाखवावी लागेल. मुस्लीम समाजाला तरी हे मान्य आहे का?
 
दिवसा ढवळ्या काहीही करायचं तुम्ही. कुठला दर्गा, कोणाची समाधी आहे ती माश्याची? राज्यकर्ते दुस-या गोष्टीत दंग असतात तेव्हा काय होऊ शकतं ते मी दाखवलं.
 
दक्ष रहा, बेसावध राहू नका, आजूबाजूला काय घडतंय कोणत्या गोष्टी घडतायत हे पाहा. हा नवीन हाजिअली निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
 
गुढी पाडवा मेळाव्याची मनसेची परंपरा
2020च्या जानेवारीमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या स्थापनेच्या तब्बल 13 वर्षांनंतर पहिल्यांदा पक्षाचं अधिवेशन घेतलं. त्यावेळी त्यांनी पक्षाचा नवा झेंडा जारी करत राजकीय भूमिकासुद्धा बदलली.
 
2020 नंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि तेव्हापासून गुढी पाडव्याच्या सभेची परंपरा सुरू केली.
 
2006ला पक्षाची स्थापना केल्यानंतर सेक्युलर भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी पुढच्या 12 वर्षांमध्ये अनेक भूमिका घेतल्या. कधी त्या त्यांच्या राजकीय छबीला साजेशा होत्या तर कधी त्या विपरीत होत्या. पण आता मात्र गेल्या 3 वर्षांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेला घातलेला हात कायम आहे.
 
मधल्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मशिदींवरच्या भोंग्यांना राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला होता. राज्यातल्या सत्ताबदलानंतर मात्र त्यांची ही भूमिका काहीशी क्षीण झालेली दिसून येतेय.
 
शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये भाजपबरोबर राज ठाकरे यांनी जवळीक वाढलेली दिसून येत आहे. दिवाळीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतरच्या दिपोत्सवात तिन्ही नेते एकत्र दिसून आले होते.
 
मधल्या काळात राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांमध्ये वाढलेली जवळीक, तसंच राज्यात झालेलं सत्तांतर, आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

7th Pay Commission:सरकारने DA Hikeवर दिली मंजुरी