शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी मशिदींतील लाऊडस्पीकर बंद करावेत, या मागणीसाठी राज ठाकरेंवर निशाणा साधला असून, मनसे प्रमुखांचे भाषण हे भाजप “स्क्रिप्टेड आणि प्रायोजित” असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर शनिवारी झालेल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये जास्त आवाजात लाऊडस्पीकर वाजवणं बंद न केल्यास मशिदींबाहेर दुप्पट आवाजात स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली जाईल अशी घोषणा केली.
“हे स्पष्ट आहे की काल शिवाजी पार्कवरील लाऊडस्पीकरचे भाषण स्क्रिप्टेड आणि भाजप प्रायोजित होते,” असे राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या संदर्भात पत्रकारांना सांगितले. काल शिवतीर्थावर राज ठाकरेंची नाही तर भाजपची सभा झाली. कालची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली होती. सभेला भाजपचाच भोंगा होता. एवढंच नाही तर कालच्या सभेत टाळ्याही स्पॉन्सर होत्या. अक्कलदाढ येते हे माहिती होतं, पण एवढ्या उशीरा….?”, असं म्हणत राज ठाकरे यांच्या भूमिकेवर संजय राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
पुढे बोलताना खासदार संजय राउत म्हणाले “मला आश्चर्य वाटते की काही लोकांना एवढ्या उशिरा अक्कलदाढ का येते. विधिमंडळात बहुमताच्या जोरावर सरकार बनते. ही संख्या महाविकास आघाडीकडे होती. खोटे बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि राज्याला स्थिरता देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले होते.”
संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगलं काम काम करत आहेत. राज्यकारभार चांगल्या पुढे जात आहे. काल मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली. राज ठाकरेंना हे दिसलं नाही का? ते फक्त आपले मशीदीवरचे भोंगे उतरवतायत”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.