Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजन विचारेंचं आनंद दिघेंना पत्र- 'गद्दारांना क्षमा नाही असं तुम्ही म्हटलं होतं; मग...'

rajan vichare
, सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:05 IST)
शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी रविवारी (31 जुलै) ठाण्यातील शिवसैनिकांसह 'मातोश्री' येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
 
गेल्या जवळपास 30 वर्षांपासून ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आनंद दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत आता त्यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना ठाण्यातून साथ देणारे राजन विचारे एकमेव खासदार आहेत
 
याच राजन विचारे यांनी सध्याच्या राजकीय गदारोळावर आपल्या भावना व्यक्त करणारं खुलं पत्र आनंद दिघे यांना उद्देशून लिहिलं आहे.
 
या पत्रात त्यांनी म्हटलं आहे-
 
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांस ..
जय महाराष्ट्र साहेब …
साहेब आज तुम्हाला जाऊन २१ वर्षे उलटली ..
असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही ..
पण आज तुमची जरा जास्तच आठवण येतेय साहेब …
 
वयाच्या सोळाव्या वर्षापासून तुमच्यासोबत काम करत आलो ..
लढलो .. धडपडलो ..ह्या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझ्यासोबत..
अजूनही आहात ..अंधारात वाट दाखवत …
धगधगत्या दिव्यासारखे ..
 
पण साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे ..तितका कधीच नव्हतो ..
कारण आज एक अशी घटना घडलीये ज्या घटनेमुळे फक्त मीच नाही,
फक्त शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना बघितलेला सर्व सामान्य मराठी माणूस सुद्धा अस्वस्थ झालाय..
आता तुम्हाला कुठल्या तोंडानं सांगू घात झाला दिघे साहेब घात झाला !
तो पण आपल्याच लोकांकडून …
म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब …
 
शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब …
तेव्हा तुमची ५६ इंचाची छाती अभिमानाने भरलेली पाहिली होती आम्ही
साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता ..
महाराष्ट्रात ज्या ठाण्याने आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली
आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय ..
छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब ..
ह्या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही ..हे तुम्हीच बोलला होता ना साहेब ..
आणि आज हे दुसऱ्यांदा झालंय …पण तुम्ही नाही आहात …
मग ह्यांना कसं माफ करायचं आम्ही …
तुम्ही असता तर काय केलं असतं ..?
म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब …
 
साहेब आज आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं ….
ह्याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होतं तुम्ही …
आज तेच बंधन माझ्या डोळ्यासमोर तुटताना बघतोय म्हणून गहिवरून येतंय साहेब ..
तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायेत ..
पण रडायचं नाही ..लढायचं ..
हा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना आहे आपली ..
साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय तुम्हाला ..
म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब ..
 
पण साहेब काळजी नसावी ..
कोणत्याही पदापेक्षा ..वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना महत्वाची ..पक्ष महत्वाचा ..
तुमची ही शिकवण मानाने मिरवत पुढे घेऊन जाणारा तुमचा राजन आणि तुमचे सगळे सच्चे शिवसैनिक आहेत आपली संघटना उभारण्यासाठी..
कितीही जण गेले तरी तुमचे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्या सोबत ..
साहेब आम्ही जीवाची बाजी लावू पण
शिवसेनेचे ठाणे … ठाण्याची शिवसेना .. हे ब्रीद पुसू देणार नाही आम्ही ..
 
पुन्हा एकदा तुमचा सैनिक ह्या वादळात पहाडासारखा उभा राहणार आहे ..
कारण तुम्ही दिलेली ताकद आजही मनगटात शाबूत आहे आमच्या ..
 
पुन्हा एकदा प्रवास खडतर असला तरी ह्या प्रवासात
तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असुद्या ..
 
आणि पुन्हा एकदा पाठीवर हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा …
 
तुमचा सच्चा शिवसैनिक
राजन विचारे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊतांना अटक हा शिवसेनेच्या मुळावर घाव आहे का?