Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१९ व्या जागतिक शांतता परिषदेचे उद्घाटन

१९ व्या जागतिक शांतता परिषदेचे उद्घाटन
नाशिक , सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (16:43 IST)
तर जगात कुठेच 'सर्जिकल स्ट्राईक' ची गरज पडणार नाही- राज्यपाल

भारताला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. यात सभ्यता आणि संस्कृती यांच्या माध्यमातून जगासमोर आदर्श निर्माण करत भारत चीनवर वरचढ ठरला आहे. त्यासाठी एकाही सैनिकाची गरज पडलेली नाही. याच संस्कृतीचे अनुकरण जगाने केल्यास कुठेच 'सर्जिकल स्ट्राईक' ची गरज पडणार नाही असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले आहे. नाशिकमध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १९ व्या जागतिक शांतता परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते.       

यावेळी पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस.बी.पंडीत,  सचिव डॉ.एम.एस.गोसावी, प्राचार्या डॉ.दिप्ती देशपांडे, प्राचार्य व्ही.एन.सुर्यवंशी आदी उपस्थित होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ.अनिल काकोडकर यांना ‘डॉ.एम.एस.गोसावी एक्सलन्स  सन्मानित करण्यात आले. या परिषदेसाठी जगातील १५० प्रतिनिधी, २५ तज्ञ परिषदेत सहभागी झाले आहेत.  या परिषदेला ६९  वर्षांचा इतिहास आहे. ही देशातील तिसरी तर राज्यातील पहिली शांतता परिषद आहे. 

बदलत्या काळानुसार अभ्यासक्रम तयार करणे आणि नाविन्यपुर्ण अध्यापन पद्धती विकसीत करणे आवश्यक आहे. आज अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयातून शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करताना दिसत नाहीत. त्यामुळे कौशल्याभिमुख शिक्षणाची गरज आहे. सोबतच विद्यापीठांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढवत  संशोधनाला चालना देणे गरजेचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  

आजच्या इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या युगात ज्ञानप्रसारासाठी डिजीटल क्लासरूम महत्वाचे आहे. अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिकदृष्टीने मागास घटकांना शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सोबतच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राचीन काळी अनेक ऋषीमुनींनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्वज्ञान जगाला दिले. भारतीय संस्कृतीने संपुर्ण जगाला अनेक शतके प्रभावित केले आहे. आगामी काळात शिक्षण हाच विकासाचा पाया ठरणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.  

webdunia
गोखले एज्युकेशन सोसायटीबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार समोर ठेऊन सोसायटीने चांगली वाटचाल केली आहे. राज्यपाल, कुलपती या नात्याने मी महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यातील अनेक विद्यापीठांच्या पदवीदान समारंभांना व अन्य कार्यक्रमांना उपस्थित रहातो. मात्र शांतता हा विषय शिक्षणात आणण्याचा प्रयत्न कोठेही दिसत नाही. गोखले एज्युकेशन सोसायटीने ही  गोष्ट करून दाखवली आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी डहाणू येथे राष्ट्रीय दर्जाच्या कौशाल्याधिष्ठीत  विद्यापीठ उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती बदलू शकेल, म्हणून संस्थेला सहकार्य करण्याची ग्वाही राज्यपालांनी व्यक्त करून संस्थेला पुन्हा एकदा भेट देण्याचा मानसही व्यक्त केला.  

विज्ञान-तंत्रज्ञान आणि अणूऊर्जा क्षेत्रात संशोधन तसेच विकासाला चालना दिली पाहिजे. विकासातून  आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून देशात सुरक्षेचे वातावरण निर्माण होऊ शकते असे डॉ.काकोडकर यांनी सांगीतले.  तर तंत्रज्ञानामुळे देशा-देशातील सीमारेषा पुसट होत आहेत. प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञानामुळे परस्परांशी जोडला जातोय. यातून जग बदलत आहे असे निगवेकर यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सोबतच प्राचार्य टी.ए.कुलकर्णी यांचे चरित्र, महावस्त्र ऑफ महाराष्ट्र-पैठणी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गोसावी यांनीही मनोगत व्यक्त केले तर देशपांडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेविषयी माहिती दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लठ्ठपणा! 25 वर्षांपासून घरातून बाहेर पडली नाही ती...