गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ते अपूर्णावस्थेत आहे. जवळपास एक लाखावर लोकसंख्येला त्यामुळे भरपूर त्रास होत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. तरीही केवळ ठेकेदाराचे भले होण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जाते. जिल्ह्यात वाळूमाफियांनी गोंधळ घातलेला आहे. मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होत आहे. प्रशासन त्यांच्यासमोर हतबल झाल्यासारखे चित्र असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला.
त्यांची सोडवणूक करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना माहिती दिली. जळगाव-अजिंठा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरूच आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल व जळगाव ते अजिंठापर्यंतच्या महामार्गाचे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावरील सर्कलच्या आजूबाजूला अतिक्रमण झालेले आहे. गेल्या आठवड्यात तेथे अपघात झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांवर लक्ष द्यावे, अशी विनंती खडसेंनी केली. या संदर्भात तातडीची बैठक घेऊन सूचना देण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले.