Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरेंची मुलाखतः काय चुकलं? शिवसेना फुटली? प्रयोग फसला का? सविस्तर…

uddhav thackeray
, मंगळवार, 26 जुलै 2022 (14:35 IST)
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून राज्यात महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय सत्तांतर नाट्याला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळते मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन व्यक्तीं भोवतीच सध्या महाराष्ट्राचे राजकारण फिरत असल्याचे दिसून येते. त्यातच एकीकडे एकनाथ शिंदे हे राजकीय दृष्ट्या प्रबळ होताना दिसत असल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील अत्यंत आक्रमक भूमिका घेत नव्याने पक्ष मांडणी आणि पक्ष बांधणी करण्याचा निश्चय केलेला दिसून येतो.
 
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि एकूणच राजकीय सध्याची राजकीय परिस्थिती या पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. दरवर्षीपेक्षा या मुलाखतीला वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तथा वाचकांमध्ये ठाकरे नेमके काय बोलतात ? याची देखील उत्सुकता आहे. त्यामुळेच या मुलाखतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सामानासाठी घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी केलेल्या प्रश्नांची जशी उद्धव ठाकरे यांनी मोकळेपणाने उत्तर दिली, तसेच त्यांनी महाविकास आघाडीचा आगळावेगळा प्रयोग चुकला होता का ? प्रश्नाचं उत्तर देऊन टाकले आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना खोचक टोले लगावले आहेत. तसेच त्यांच्या बोलण्यात एक संतापही जाणवतो आहे.
 
गेल्या एक महिन्यापूर्वी पहाडासारखे मजबूत दिसणारे ठाकरे सरकार काही दिवसातच कोसळले, कारण शिवसेनेतल्या एका बड्यान नेत्याने बंड केले. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत पन्नास आमदार नेत पत्त्याचा डाव कोसळायला लावावा, तसे ठाकरे सरकार कोसळायला भाग पाडले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी टीकेचे बाण चालत राहिले व आरोप प्रत्यारोप होत राहिले. मात्र त्यानंतरच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली ही वादळी मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला, तो म्हणजे नक्की काय चुकले आपले? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? तर त्याला ठाकरे यांनीही त्याच भाषेत उत्तर दिले आहे.
 
याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, चूक माझी आहे, ते मी माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये पहिल्याच सांगितले आहे, कबूल मी केले आहे. गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातला समजून मी यांच्यावरती अंधविश्वास ठेवला. असे उत्तर ठाकरेंनी दिले, त्यावर राऊतांनी प्रश्न केला, तुमचे मुख्यमंत्री होणे चुकले ? त्यावर ठाकरेंनी उत्तर दिले, यात दोन गोष्टी आहेत, समजा मी त्या वेळेला यांना मुख्यमंत्री केले असते. तर यांनी दुसरेच काहीतरी केले असतं. कारण यांची भूकच भागत नाहीये. यांना मुख्यमंत्री पदही हवे आहे आणि यांना शिवसेना पक्षप्रमुख ही व्हायचे आहे. हे शिवसेना पक्षप्रमुखांसोबत यांची तुलना करत आहेत, ही राक्षसी महत्वकांक्षा आहे, त्याला हाव म्हणतात. एक दिलं की तुझं तेही माझं, माझं तेही माझं, याचं तेही माझं, इथपर्यंत यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणांना सीमा नसते, असा घणाघात ठाकरेंनी केला.
 
तसेच यावर पुन्हा राऊतांनी प्रश्न केला,महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? त्यावर ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. तसं झालं नाही, जनता ही आनंद होती, कारण सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त केलं होतं, त्याच्यानंतर कोरोना काळात मी अभिमानाने सांगेल संपूर्ण माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले, म्हणूनच ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आले ते जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आले होते. जर समजा यांनी सहकार्य केलं नसतं तर कोण होतो? मी मी एकटा काय करणार होतो? असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी केला.
 
यावेळी ठाकरेंनी त्यांच्या घराबाहेर न पडण्याच्या टीकेलाही उत्तर दिले आहे, मी घराबाहेर पडत नव्हतो, घराबाहेर पडायचं नाही हेही मी लोकांना सांगत होतो. घराबाहेर न पडता सुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव का आले? कारण त्या वेळेला परिस्थिती तशी होती. मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि लोक ऐकत होती. मी आजही घराबाहेर पडलो तर शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने गर्दी होतेच, मग काय झालं असतं? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, तेव्हा ती काळाची गरज होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
विशेष म्हणजे ठाणेकर हे सुज्ञ असून शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली त्या ठाण्यातच काय तर महाराष्ट्रभरातील लोक निवडणुकीचा वाटत पाहत असून निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोरांचा हा पालापाचोळा उडून जाईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. इतकचे नाही तर त्यांनी राजकीय पक्षांनी युती करताना करार करुन तो जनतेसमोर ठेवायला हवा असा कायदा बनवण्याची मागणीही केली. याशिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर माईक खेचल्याच्या मुद्द्यावरुन माजी विरोधी पक्ष नेत्यांवर टीका करताना त्यांनी खेचलेल्या माईकवरुन केलेलं विधान हे शिवसेना संपवण्यासंदर्भातील डाव असल्याचा दावा केला आहे.
 
ठाकरे म्हणाले की, मासे आणि भाजपाचे जे ठरले होते ते आधी त्यांनी नाकारुन आता पुन्हा तेच केले. हे जनतेसमोर उघडपणे आलं असतं. दुसरी गोष्ट निवडणुकीनंतर मला जे काय करावे लागले ते टळलं असते. महाविकास आघाडीचा जन्म नसता झाला. महाविकास आघाडीचा जन्म आम्ही दिला तेव्हा सुद्धा तुम्ही पाहिले की, मी शपथ शिवतिर्थावर घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आणि बाळासाहेबांच्या स्मारकाच्या साक्षीने शपथ घेतली. शिवतिर्थ पूर्ण फुलून गेलं होते. लोक नाराज असती तर तिकडे कोणी आलं नसते, असेही म्हटले.
 
ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “माझं मत असं आहे की, आता निवडणुका घ्या. जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करुन चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील. नाहीतर आमच्याशी केलेला करार मोडणाऱ्या भाजपाला घरी बसवतील. ते घरी बसतील किंवा आम्ही पाप केलं असेल तर आम्हाला घरी बसवतील. होऊ द्या जनतेच्या न्यायालयामध्ये फैसला. माझी तयारी आहे. महाराष्ट्राची जनता मला ओळखते. आमची सहावी पिढी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत आहे,” असं म्हणत उद्धव यांनी जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Fake Shopping Website: बनावट शॉपिंग वेबसाइटओळखण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबवा