कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथील होणार नसून उलट नियम पाळले जात नसतील तर अधिक कठोर करण्यात येतील असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी कोल्हापुरात करोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कोल्हापूरवासियांना इशारा दिला आहे.
निर्बधांच्या बाबतीत कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर असून महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉझिटिव्हीचं प्रमाण कोल्हापुरात आहे. यामुळे येथे निर्बंध अजिबात शिथील केले जाणार नसून उलट अधिक कडक केले जाऊ शकतात. कोल्हापूरने लवकरात या परिस्थिती बाहेर पडावं यासाठी थोडा वेळ सोसावं लागणार आहे.
येथील लोक मास्कऐवजी रुमाल वापरत असल्याचं देखील आढळलं आहे जे योग्य नाही अशाने आपण स्वत: आपलं आरोग्य धोक्यात घालत आहात. याचा फटका निष्पापांनाही बसत आहे. त्यांनी पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निर्बंधांची कडकपणे अमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.
कोल्हापुरात सध्या कोरोना आटोक्यात नाही त्यामुळे दौऱ्यावर असणार्या अजित पवारांनी औषध, लसींचं परिस्थिती याचा आढावा घेतला, लोकप्रतिनीधांशी चर्चा केली तसंच होम आयसोलेशन कमी करुन संस्थात्मक विलगीकरण यावर भर देण्याचं सांगितलं. फायर, ऑक्सिजन ऑडिट, लहान मुलांसाठी टास्क फोर्स सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागात आपल्या वतीने प्रयत्न करत असून पहिल्या लाटेत केलं त्या आक्रमकपणे काम आत्ता काम करण्याची गरज असून लोकप्रतिनिधींनीही सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी पार पाडली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
आपल्या जिल्ह्यातील करोना कमी करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन पवार यांनी कोल्हापूरवासियांना केलं आहे.