कोल्हापूरमध्ये आलेल्या ९ कलाकार प्रवाशांना रात्री जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार शहरातील गंजी गल्ली येथील एका यात्री निवासामध्ये उघडकीस आला. बेशुद्ध झालेल्या महिला आणि पुरुषांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. नेमका चोरट्यांनी किती ऐवज चोरून नेला हे अद्याप समजू शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राचवाडी (ता. चाकुर जि. लातूर) येथील ९ कलाकार कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. यात पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. ते गंजी गल्ली येथील एका यात्री निवासमध्ये थांबले होते. रात्री जेवणातून त्यांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. कुंताबाई रामकिशन कवर, द्रोपदाबाई मल्हारी सूर्यवंशी, रमाबाई महादेव कांबळे, सखुबाई पिराजी सूर्यवंशी, लताबाई सूर्यवंशी, मशनाजी चिंचोळे, रामकिशन सिताराम कवरे, मल्हारी सूर्यवंशी, अशोक अंकुश भुरे (सर्व रा. राचवाडी ता. चाकुर जि. लातूर) अशी नावे उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.