Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; आमदार रोहित पवारांनी उडवली खिल्ली

किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; आमदार रोहित पवारांनी उडवली खिल्ली
, गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (08:16 IST)
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचं सत्र सुरू केलं आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या मागे ईडी लागल्याचं दिसून येत आहे. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमय्या यांची खिल्ली उडवली आहे. रोहित पवार दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि कर्जत-जामखेडमधील विकासकामांवर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “सोमय्यांना भाजपने एक ऑफिशियल पोस्ट द्यावी. ईडीचे प्रवक्ते अशी काही तरी पोस्ट त्यांना द्यावी. आता त्यांच्याकडे एक प्रतिनिधी एवढंच पद आहे. त्यांना प्रवक्ते केले तर ते ईडीचे प्रतिनिधी आहेत हे ऑफिशियल होऊन जाईल. ईडीला कळायच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्यांच्यावर टीव्हीचा फोकसही असतो, त्यामुळे त्यांना हे पद द्यायला हरकत नाही”.
 
अशा शब्दात त्यांनी सोमय्या यांना टोला लगावला असून ईडीच्या गैरवापरावरही टीकास्त्र सोडलं. “ईडी किंवा सीबीआयचा राजकीय वापर होत असेल तर ते घातक आहे. काही काळानंतर तसाच पायंडा पडतो. एखाद्या राजकीय नेत्याला दाबायचं असेल तर अशाच यंत्रणाचा वापर केला पाहिजे, असं संबंधितांना वाटतं. लोक घाबरतात. कारण त्यात तथ्य नसलं तरी त्या प्रक्रियेने त्रास होतो. कुटुंबावर परिणाम होतो. त्यातून काहीच बाहेर येत नाही”, असंही पवार यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, “अशा गोष्टीतून राजकीय मनस्तापच होतो. ते थांबलं पाहिजे. बोलायचं तर मूलभूत मुद्दयावर बोलू. राज्य सरकार चुकत असेल तर त्यावर बोलू. याचा दहावा नंबर त्याचा बारावा नंबर यामध्ये गुंतून राहिला तर ईडीवर लोकांचा विश्वास राहणार नाही”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार