Sambhaji Nagar Two year old dies मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरात अंघोळीसाठी ठेवलेले पाणी गरम अंगावर पडल्याने दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरात बहिणींसोबत खेळताना चिमुकलीच्या अंगावर गरम पाणी सांडले. ही घटना शुक्रवारी घडली होती. यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.
शिद्रा हारून शेख असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. शिद्रा ही आई- वडील, आजी, आजोबासोबत कांदबरी दर्गा छावणी परिसरात राहत होती. दरम्यान, शुक्रवारी शिद्राच्या आईने पतीच्या अंघोळीसाठी गॅसवर पाणी ठेवले आणि बाथरूममध्ये गेली. त्यावेळी शिद्रा तीन बहिणींसोबत घरात खेळत होती. मात्र, शिद्राचा गरम पाण्याच्या बादलीला धक्का लागला. पाणी अंगावर सांडल्याने ती भाजली. त्यानंतर शिद्राला त्वरीत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.