Publish Date: Wed, 01 Sep 2021 (22:21 IST)
Updated Date: Wed, 01 Sep 2021 (22:25 IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची वेळ मागितील होती. राष्ट्रपतींनी खासदार संभाजीराजेंना गुरुवार २ सप्टेंबरची भेटीची वेळ दिली आहे. राज्यातील सर्वपक्षीय एक खासदार प्रतिनिधींसोबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींची भेटीची वेळ मिळाली असून गुरुवारी भेटणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली होती. मराठा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या भावना राष्ट्रपतींसमोर मांडण्यासाठी संभाजीराजेंनी वेळ घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतली असून मराठा समाजाच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न संभाजीराजे करत आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी राज्यातील प्रमुख ४ पक्षातील खासदार प्रतिनिधींना सोबत येण्याचे आवाहन केलं आहे. यामध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, काँग्रेसकडून प्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटे तर भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहे. हे शिष्टमंडळ खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची गुरुवारी दुपारी ४.३० वाजता संभाजीराजे छत्रपती आणि सर्वपक्षीय लोकप्रितिनीध भेट घेणार आहेत. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करुन राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु केंद्र सरकारने आरक्षणातील ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी अशी मागणी राज्य सरकारची आहे. १२७ व्या घटनादुरुस्तीचमुळे राज्यांना अधिकार प्राप्त झाले आहेत.