महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (19 डिसेंबर) नागपूरमध्ये सुरू झालंय.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे-वाघ यांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे. सरोज या आपल्या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. त्या नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत.
"मी आई आहेच, सोबत आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन आले आहे,” असं सरोज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
बाळाला दूध पाजण्यासाठी विधीमंडळ परिसरात फीडिंग रुम हवी. हिरकणी कक्ष हवा. महिला आमदारांसाठी तशी सोय करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली आहे.
सरोज अहिरे कोण आहेत?
सरोज अहिरे या नाशिकच्या देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. नाशिक मधील दंतरोगतज्ज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्याशी फेब्रुवारी 2021 ला त्यांचा विवाह झाला. अडीच महिन्यांपूर्वी त्यांनी गोड बाळाला जन्म दिला.
सरोज यांचे वडीलही आमदार होते. सरोज 2017 नाशिक महानगर पालिकेच्या नगरसेवक झाल्या आणि 2019 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सरोज यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश घोलप यांचं आव्हान होतं.
मात्र, सरोज यांनी तब्बल 41 हजार मतांनी घोलप यांचा पराभव करीत शिवसेनेची तीस वर्षांची सत्ता काबीज केली.
Published By- Priya Dixit