राज्यात सध्या अनेक भागांत ढगाळ वातावरण (Weather) झाल्याने उन्हाच्या कडाक्यापासून (Heat Wave) काहीसा दिलासा मिळाला. मात्र उकाड्याचा त्रास कायम होता. काही भागांत आज पाऊस (Heavy Rain) झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यातच आज सातारा शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं झोडपलं.
साताऱ्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं प्रचंड उकाडा वाढला होता. त्यामुळे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सातारा शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी येथील भिलर या भागात जोरदार गारपीट झाली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. सोसाट्याचा वाऱ्याने अनेकांची तारांबळ उडाली. वारा सुटल्याने सुमारे एक तासाहून अधिक काळ वीज गायब झाली होती. महाबळेश्वर मार्केटमध्ये अचानक पाऊस आल्यानं पर्यटकांची धावपळ उडाली.