Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्राला भेटणार दुसरी वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान मोदी करणार उदघाटन,या मार्गावर धावणार

महाराष्ट्राला भेटणार दुसरी वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान मोदी करणार उदघाटन,या मार्गावर धावणार
, सोमवार, 5 डिसेंबर 2022 (20:58 IST)
देशातील सर्वाधिक गती आणि आलिशान असलेली वंदे भारत एक्सप्रेस आणखी एका नव्या मार्गावर धावणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद या मार्गावर ती धावत आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राला दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ११ डिसेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यादिवशी ते बिलासपूर (छत्तीसगड) ते नागपूर (महाराष्ट्र) या मार्गावर चालणाऱ्या देशातील सहाव्या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करतील.
 
आठवड्यातून ६ दिवस सेवा
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. सुमारे साडेपाच तासात प्रवासाचा एका टप्प्यातच पूर्ण करेल. बिलासपूर-नागपूर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) नागपुरात होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ही ट्रेन बिलासपूर येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल आणि सुमारे १२.१५ वाजता नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे ही गाडी नागपूरहून दुपारी २ वाजता सुटेल आणि ७.३५ वाजता बिलासपूरला पोहोचेल. सध्या सुपरफास्ट गाड्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी सुमारे सात तास लागतात, मात्र ही ट्रेन सुमारे साडेपाच तासांत अंतर कापते.
 
हे थांबे असतील
या प्रकरणाशी परिचित असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याच्या मते, ही ट्रेन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) द्वारे चालवली जाईल आणि तिचे रायपूर, दुर्ग आणि गोंदिया येथे नियोजित थांबे असतील. २०२३ मध्ये सिकंदराबाद आणि विजयवाडा दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
 
दक्षिण मध्य रेल्वे (SCR) मधील ही स्वदेशी बनावटीची पहिली अर्ध-हाय-स्पीड रेल्वे असेल आणि दक्षिण भारतातील अशी दुसरी ट्रेन असेल, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले. या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबई-अहमदाबाद मार्गावर नव्या पिढीतील वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले होते. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत ७५ वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
 
अशी आहेत वैशिष्ट्ये
सेमी-हाय-स्पीड ट्रेनचे सर्व डबे स्वयंचलित दरवाजे, GPS-आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणाली, मनोरंजनाच्या उद्देशाने ऑनबोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि आरामदायी आसनांनी सुसज्ज आहेत. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर रवाना झाली होती.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राला सोन्याचे दिवस..सापडल्या सोन्याच्या खाणी