Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्रीय मंत्री दानवेंनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; व्हिडिओ व्हायरल दानवे म्हणाले…

danve
, सोमवार, 5 डिसेंबर 2022 (14:45 IST)
औरंगाबाद  – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ रविवारी प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांच्यावर टिकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. याबाबत आता दानवेंनी खुलासा केला आहे. संबंधित व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
या प्रकरणी खुलासा करताना दानवे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी एकेरी भाषेचा उल्लेख केल्याचं वृत्त दाखवण्यात आलं. मी त्याबद्दल खुलासा करू इच्छितो. दोन वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांनी मला राज्यपालांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्या काळात अनावधानाने माझ्याकडून अशाप्रकारे एकेरी उल्लेख केला गेला होता. तेव्हासुद्धा माझ्याविरोधात टीकेची झोड उठली होती. त्यावेळी मी माफीही मागितली होती. विषय मिटला होता. आज पुन्हा तो व्हिडिओ दाखवला जात आहे. ती घटना काल किंवा आज घडली, असं पसरवलं जात आहे. मी आपल्याला खुलासा करू इच्छितो. त्या वक्तव्याची माफी मी तेव्हा मागितली होती. आजही मागतो. आज अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य मी केलेलं नाही”, असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध राज्यभरातून होत आहे. त्यानंतर भाजपाचे सुधांशु त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा यांनीही एकापाठोपाठ एक वक्तव्ये केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना भाजपा पाठिशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील भाजपाला इशारा दिला आहे. शनिवारी रायगडावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल, अशा शब्दात सरकारला सुनावले. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना याबाबत एक पत्रही पाठवले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता राष्ट्रपती या पत्राची दखल कशी घेतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीस-शिंदेंच्या टेस्ट ड्राईव्हची कार आहे ‘या’ बिल्डरची; चर्चा तर होणारच