Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चाय बेचो..देश मत बेचोः भुजबळ

चाय बेचो..देश मत बेचोः भुजबळ
अकलूज , गुरूवार, 31 जानेवारी 2019 (11:49 IST)
देश के साथ मन की बात आणि अदानी, अंबानी के साथ धन की बात करणार्‍या मोदी सरकारने देशातील लोकशाही मोडीत काढण्याचे काम केले आहे. मीडियावर दडपण आणून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मोडकळीस आणला आहे. मोदी आप चाय बेचो... देश मत बेचो असे म्हणायची आता वेळ आली असल्याची प्रखर टीका छगन भुजबळ यांनी अकलूज येथील निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या सभेत केली.
 
अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजय चौकात झालेल्या   सभेत माजी उपमुख्यमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, विजय कोलते, अजिंक्यराणा पाटील, उमेश पाटील, संतोष पवार, रमेश बारसकर, राजूबापू पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील,
अर्जुनसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
 
भुजबळ म्हणाले, भाजप सरकारला सत्तेचा माज आला असून त्यांचे सरकार उलथून टाकण्याचे कसब माझ्यामध्ये आहे. अजित पवार म्हणाले, बारामती येथे धनगर समाजाला कॅबिनेटच्या पहिल्या मिटिंगमध्ये आरक्षण देऊ म्हणून फडणवीसांनी त्यांची फसवणूक केली. महादेव जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या जमिनी विका व राजकारण करा असा सल्ला देतात. सुभाष देशुखांच्या कारखान्याला हमीभाव देत नाही म्हणून शेतकर्‍यांनीच टाळे लावले. उद्धव ठाकरेंना निवडणुका जवळ आल्या की श्रीरामाची उचकी लागते असे म्हणत मोदींची अवस्था शेवटी सद्दाम हुसेन व हिटलरसारख्या हुकूशहांसारखी होणार असल्याचे पवार म्हणाले. 
 
धनंजय मुंडेंनी अबकी बार मोदी की हार असा नारा देत या सरकारला कारभार करायची अक्कल नसल्याचे म्हटले. अच्छे दिनची आज चेष्टा होऊन लोक मोदींना शिव्या देत आहेत. मोदींनी पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ करून जनतेची लूट केली आहे. जलयु्क्त शिवार ही योजना साफ फसली तरीही हे सरकार शेतकर्‍यांना चारा छावणी, चारा डेपो व पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करत नसल्याचे म्हटले.
 
मते का मिळाली नाहीत 
मागील लोकसभा निवडणुकीत विजयदादांना माण, खटाव, सांगोला, पंढरपूर, माढा या भागातून कमी मते मिळाली. माळशिरस तालुक्याने त्यांना लिड दिले. पक्षात राहून तुम्ही करता काय? असा स्पष्ट सवाल अजित पवार यांनी  व्यासपीठावर उपस्थित माढा, सांगोला, पंढरपूर भागातील नेत्यांना विचारला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन