केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवून त्यांच्या सूचनांनुसारच राज्य सरकार कोरोनाविषयीचे निर्णय घेत आहे. त्यामुळं मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी तारतम्य बाळगावं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे.
मंदिरं उघडण्यासठी भाजप आणि मनसेकडून आंदोलनं केली जात आहेत. त्यावर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे असं पवार म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
केंद्र सरकार विरोधकांविरोधात ईडीचा वापर करत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी पुन्हा एकदा केला. महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतही याचा वापर केला जात असल्याचं पवार म्हणाले.
शेतकऱ्यांकडं सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंही पवार म्हणाले. शेतकरी चौदा महिन्यांपासून घरदार सोडून आंदोलन करित आहे. पण त्यांच्या आंदोलनाची नोंद घेतली नाही, अशी टीका पवारांनी केली.
राजू शेट्टींच्या आमदारकीच्या मुद्द्यावरही पवारांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवून शब्द पाळला आहे, आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडं लक्ष असल्याचं शरद पवार म्हणाले.