विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी सगळ्याच पक्षांनी आपआपल्या जागा राखल्या आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. सुधीर तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. सुधीर तांबे 69 हजार 562 मतं मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांचा तब्बल 42 हजार 825 मतांनी पराभव केला.
अमरावती पदवीधर मतदारसंघातून गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजीत पाटील विजयी झाले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीची 66 हजार मतं मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांचा पराभव केला. त्यामुळं भाजपनं अमरावतीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे 11 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या सतीश पत्कींचा पराभव केला. विक्रम काळेंना 25 हजार 288मतं मिळाली. तर पत्कींना 13 हजार 735 मतं मिळाली.
कोकण शिक्षक मतदार संघात शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीचे संयुक्त उमेदवार बाळाराम पाटील यांचा विजय झाला आहे. याठिकाणी शिवसेना पुरस्कृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पराभव झाला आहे.