राज्यातील सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतात. आता देखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असेच वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठे वादंग निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील शिवरायांविषयी विनाकारणच बेताल वक्तव्य केल्याने वादात आणखीनच तेल ओतल्यासारखे झाले आहे. त्यामुळे या दोघा व्यक्तींबद्दल सर्व स्तरातून निषेध होऊन व्यक्त होत असताना शिंदे गटाच्या आमदारांना देखील नाराजी व्यक्त केली आहे. अशा वक्तव्यामुळे शिंदे गट आणि भाजप यामध्ये विनाकारण वितृष्ट निर्माण होईल, असे मत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
भाजपने शिवरायांबद्दल सांभाळून बोलावे, अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होऊन त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील, असा इशाराही आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. बुलढाणा येथे एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले की, शिवाजी महाराज यांचा इतिहास कधीच जुना होणार नाही. शिवरायांची तुलना कोणत्याही महापुरुषांसोबत होऊ शकणार नाही. राज्यपाल सातत्याने शिवरायांबद्दल एकेरी भाषेत बोलत आहेत. केंद्रीय नेत्यांना मी विनंती करतो की, ज्या राज्यपालांना या राज्याचा इतिहास माहित नाही, अशा राज्यपालांना खुर्चीवर ठेऊन काही फायदा नाही, मराठी मातीतला माणूसच या ठिकाणी हवा. त्यामुळे या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचे तिथे पाठवा.
आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा देखील समाचार घेतला आहे. शिवाजी महाराज होते म्हणून हा महाराष्ट्र आहे. शिवरायांबद्दल बोलताना राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी विचार करायला हवा. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होतो हे चांगले नाही, अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील असा इशाराही संजय गायकवाड यांनी दिला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त असून राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर तीव्र टिका होत आहे. तसेच वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. कोश्यारी यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र विरोध होत आहे.
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती असे वादग्रस्त विधान त्रिवेदी यांनी केले आहे. तर दुसरीकडे आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.
सदर प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor