Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदेंच्या तावडीतून 'असे' निसटले शिवसेना आमदार कैलास पाटील

kailash patil
गुरूवार, 23 जून 2022 (08:46 IST)
- दीपाली जगताप
"साहेबांना भेटायचं आहे," असं सांगून शिवसेनेचे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांना विधिमंडळातून थेट सुरतला नेण्यात येत होतं. पण ते प्रवास सुरू असतानाच तिथून निसटले.
 
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सुरतला कसं नेलं, याचा एक प्रसंग समोर आला आहे. मुंबईत ते सुरत हा प्रवास आणि त्यातून निसटणं हा कैलास पाटलांचा प्रसंग एखाद्या थराराहून कमी नाहीय.
 
कैलास पाटील हे उस्मानाबादचे शिवसेनेचे एक तरूण आमदार आहेत. ही त्यांची पहिली टर्म आहे. शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख देखील आहेत.
 
लघुशंकेच्या बहाण्यानं गाडीतून उतरले आणि पळून आले...
10 जागांसाठी झालेल्या विधान परिषद निवडणूक संपल्यानंतर कैलास पाटील यांच्यासह काही आमदारांना गाडीत बसवण्यात आलं.
 
'एकनाथ शिंदे भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत,' असं सांगत विधिमंडळातून त्यांना नेण्यात आलं आणि प्रवास सुरू झाला.
 
दोन ते तीन तास झाले तरी एकनाथ शिंदे यांच्याशी काही भेट झाली नाही म्हणून कैलास पाटील यांना शंका आली. गाडीत बसवून आपल्याला नेमकं कुठे घेऊन चालले आहेत? असा प्रश्न त्यांना पडला.
 
तोपर्यंत गाडी महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ पोहचली होती. आपली दिशाभूल झालीय, हे तोपर्यंत कैलास पाटील यांना कळून चुकलं होतं.
 
लघुशंकेसाठी गाडी थांबवा, असं त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं. गाडीतून खाली उतरताच अंधाराचा फायदा घेत कैलास पाटील तिथून निसटले.
 
महाराष्ट्र सीमेवरून त्यांनी भर पावसात 4-5 किलोमीटर पायी प्रवास केला. सोबत गाडी नसल्यानं त्यांना चालत जावं लागलं. पुढे त्यांना एका मोटार सायकलवर लिफ्ट मिळाली. मोटरसायकलवरून ते साधारण 30-40 किमी अंतर पुढे आले.
 
एका गावाच्या ठिकाणी त्यांना मोटरसायकलवरून उतरावं लागलं. त्यांना मुंबई गाठायची होती आणि रात्रीचा एक वाजून गेला होता.
 
एक मालवाहतूक ट्रक समोरुन येताना दिसला आणि ते ट्रकवर चढले. मुंबईतील दहिसर नाक्यापर्यंत ते ट्रकने आले. मुंबईत प्रवेश केल्यावर कैलास पाटील यांना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं घर गाठायचं होतं.
 
...आणि कैलाश पाटील थेट 'वर्षा'वर पोहोचले
उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर ते पोहचले. दहिसरपासून एका खासगी वाहनाने ते वर्षावर पोहचले आणि त्यांनी सर्व माहिती सांगितली.
 
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेल्या आमदारांनाही ते कुठे घेऊन चालले आहेत याची कल्पना नव्हती, असं एका आमदाराने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
कैलास पाटील यांच्यासोबतच्या आमदारांनाही त्यांनी विचारलं. पण आपण ज्या गाडीत बसलोय ती गाडी गुजरातला चालली आहे हे त्यांनाही माहिती नव्हतं असं ते सांगतात.
 
एकनाथ शिंदे आमदारांना ठाण्यात जेवणासाठी घेऊन गेले होते अशीही माहिती समोर आली. पण जेवणाचा कुठलाही बेत नव्हता, असं काही ठरलं नव्हतं असं तिकडे गेलेल्या एका आमदाराने स्पष्ट केलं.
 
एकनाथ शिंदेंचं बंड
शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिलीय. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक मानले जातात. मात्र, त्यांच्याच बंडामुळे शिवसेना पक्षात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय.
 
एकनाथ शिंदेंचा ठाणे जिल्ह्यातल्या राजकारणात दबदबा आहे. किंबहुना, ठाण्यातील शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे असं समीकरण जवळपास तयार झालंय. त्यामुळे या बंडांच्या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
 
आधी राज्यसभेच्या निवडणुकीत आणि नंतर विधान परिषदेत महाविकास आघाडीला मिळालेल्या धक्क्यानंतर सावरण्याचा वेळ मिळतो न मिळतो तोच एकनाथ शिंदेंचा फोन नॉट रिचेबल आला.
 
सकाळ उजाडयाच्या आत बातम्या पसरल्या की एकनाथ शिंदे सुरतमध्ये आहे. त्यांच्यासोबत 11 आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक ठेवलेली असतानाच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मनसुब्यांचे तीन तेरा वाजवले.
 
पुन्हा बातम्या येऊ लागल्या की एकनाथ शिंदेंसोबत 11 नाही तर 20 हून अधिक आमदार आहेत नंतर तो आकडा 30 च्या पार गेला. सुरतहून शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीत पोहोचले. तिथे पोहोचल्यावर एकनाथ शिंदेंनी आणखी एक धक्का दिला. ते म्हणाले, आमच्यासोबत 31 नाही तर 40-41 आमदार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगरमध्येही मराठीतून पाट्या, दुकानदाराना १५ दिवसांची मुदत