भाजपने शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकावर जागा देत एनडीएच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत घोषणा केली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा भाजपकडून पहिल्यांदाच अधिकृत शेवट करण्यात आला आहे.
प्रल्हाद जोशी म्हणाले, “शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकांना हजर राहत नव्हती. त्यांचे मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेससोबत काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून त्यांनीच विरोधीपक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाशी सहमत आहे. म्हणूनच आम्ही शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधीबाकावर जागा दिली आहे.