शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची काल (3 जुलै) मुंबईत गुप्त बैठक पार पडली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळ तर्क-वितर्कांना सुरुवात झालीय.
मुंबईतल्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना संजय राऊत आणि आशिष शेलार हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. मात्र, संजय राऊत यांच्या गेल्या काही आठवड्यांमधील भेटींचा सिलसिला पाहताना या भेटीमुळे चर्चेलाही उधाण आलंय.
या भेटीवर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. यात भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, भाजप शिवसेनेसोबत जाण्याचा प्रयत्न करणार नाही.
मात्र, "राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते परततील, तेव्हा भाजप विचार करेल," असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.