माझी मुलगी कोणाशी लग्न करणार हे तुम्ही नाही ठरवणार. कोणत्याही पक्षाने मॅट्रिमोनीचा प्रोग्राम काढलेला नाही आणि जर ढवळाढवळ करायची असेल तर राजकीय पक्ष बंद करा, मॅट्रिमोनी काढा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
"मी, अजित पवार आणि जयंत पाटलांनी मॅट्रिमोनी सुरु केलेली नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही रोटी, कपडा, बेरोजगारी यावर काम करतो. त्यामुळे तुम्ही काय खाणार, काय परिधान करणार, किती वाजता घरी येणार याबद्दल आम्हाला देणंघेणं नाही. आम्ही धोरणात्मक बाबींवर बोलतो," असंही त्यांनी म्हटलं.
'आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती'संबंधी शासनाने घेतलेला निर्णय त्वरित रद्द व्हावा अशी मागणी सलोखा समिती महाराष्ट्रने केली आहे.
नाशिकमध्ये त्यांचा एक कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे, भाई जगताप, मनिषा कायंदेंनी हजेरी लावत भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, 'आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती' शासन निर्णयाबाबत मविआने भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
Published By -Smita Joshi