राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहाबाहेर येऊन त्यांनी घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. सध्या करोनाचे संकट असून शेअर मार्केटही पडलं आहे. मंदीचा देशाला आणि राज्याला फटका बसत आहे. या सर्व परिस्थितीत आम्हाला विकासाच्या योजना मांडायच्या होत्या. समाजातील गरीब, वंचित घटकांना न्याय द्यायचा होता आणि अर्थसंकल्पाच्या माध्यातून आम्ही तो प्रयत्न केला असे अजित पवार यांनी सांगितले.
– २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली.
– दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना आणण्यात येईल. २१ ते २८ वयोगाटतील तरुण-तरुणींसाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.
– शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळत नाही अशी तक्रार होती. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५ लाख सौरपंप बसवून देण्यात येतील. वर्षाला एक लाख पंप बसवण्याचे उद्दिष्टय आहे. ६७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
– महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
– गाव तिथे एसटी यासाठी १६०० नव्या एसटी बस विकत घेण्यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल. बस स्थानकांसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
– आरोग्यासाठी ५ हजार कोटी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
– क्रीडा संकुलासाठी भरीव तरतूद, राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठी रूपये २५ कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. हा निधी यापूर्वी केवळ ८ कोटींचा होता. त्यात वाढ करण्यात आली आहे.
– आमदारांना मतदारसंघात विकासकामे करायची असतात. त्यासाठी आमदार निधी दोन कोटीवरुन तीन कोटी रुपये करण्यात आला आहे.
– मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये बांधकाम उदयोगाला चालना देण्यासाठी पुढच्या दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्के सवलत देण्यात आली आहे.
– औद्योगिक वापराच्या वीजेच्या शुल्कातही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांचा महसूली तोटा अपेक्षित आहे.