बुलडाणामध्ये शेतात कामाला जा आणि कमवून आण, असा तगादा लावत कामावर जात नसल्याने 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकलून दिले आहे. द्वारकाबाई पल्हाडे असं या वयोवृद्ध आईचं नाव आहे. त्या दोन मुलं, सून आणि नातवंडांसह पळशी येथे राहतात. मात्र काही दिवसांपासून द्वारकाबाई पल्हाडे यांना त्यांचा मुलगा सहदेव आणि वासुदेव पल्हाडे यांनी घरातून हाकलून दिले आहे. तर सुनांनी शिवीगाळ करत मारहाणही केली असल्याचा आरोप द्वारकाबाईंनी केला आहे. ही घटना घडल्यावर वृद्ध महिलेने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठीत त्यांच्या दोन मुलांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
या वृद्ध महिलेकडे जवळपास 12 एकर शेती आहे. ही शेती त्यांची मुलं करतात. मात्र या वृद्ध आईला या वयात मुलांकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सामान्य रुग्णालयात आसरा घेऊन द्वारकाबाई जीवन जगत आहेत.