Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनालीचं कुस्तीच्या आखाड्यात मुलांना आव्हान

सोनालीचं कुस्तीच्या आखाड्यात मुलांना आव्हान
अहमदनगर , गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:46 IST)
अभिनेता आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने हरियाणाच्या गीता आणि बबिता या फोगाट महिला पैलवानांची प्रेरणादायी कहाणी नुकतीच जगासमोर आणली. महाराष्ट्राच्या मातीतही आता दुसरी गीता किंवा दुसरी बबिता उभी राहू पाहत आहे. तिचं नाव सोनाली कोंडिबा मंडलिक.
 
सोनाली ही मूळची अहमदनगरच्या कर्जतमधल्या कापरेवाडीची. नगरच्या या लेकीने अहमदनगर जिल्हा चषकासाठी येत्या रविवारी होत असलेल्या कुस्ती स्पर्धेत मुलांना आपल्याशी कुस्ती खेळण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे ‘नगरची छोरी भी छोरों से कम नहीं,’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
 
“कुस्तीला सुरुवात केली तेव्हा मुलांसोबत कुस्ती खेळायचे. 23 तारखेला ज्या स्पर्धा आहेत, त्यासाठी मुलींनाच नाही तर मुलांनाही आव्हान आहे, मुली कुस्ती खेळतात हेच मला माहित नव्हतं. मी मुलांसोबतच प्रॅक्टिस करायचे. त्यामुळे मुलांसोबत खेळायला मला भीती वाटत नाही,” असं सोनाली म्हणाली.
 
…म्हणून पैलवान झाले!
“माझे वडील पैलवान होते. माझ्या आत्याच्या मुलाला आणि मुलीला त्यांना पैलवान बनवण्याची वडिलांची इच्छा होती. पण आत्या पप्पांना म्हणाली की, तुला मुलगी झाल्यावर तिला पैलवान बनव. म्हणून माझ्या पप्पांनी मला पैलवानं केलं,” असं पैलवान सोनाली मंडलिक म्हणाली.
 
‘दंगलची आणि माझी स्टोरी सारखीच’
सोनाली सांगते की, “दंगलची जी स्टोरी आहे, तीच माझ्या घरची स्टोरी आहे. फरक एवढाच की त्या चौघी पैलवान आहे आणि मी एकटीच पैलवान आहे. पण आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. माझ्या प्रॅक्टिस आणि खुराकसाठी महिन्याला 10 ते 15 हजा रुपये खर्च होतो. पैशांची व्यवस्था होत नाही म्हणून माझ्या वडिलांनी शेती विकायला काढली आहे.”
 
सोनाली मंडलिकचं यश
सोनाली मंडलिक ज्युदो कुस्तीत जिल्ह्यात अव्वल होती. राष्ट्रीय स्तरावर पहिल्या वर्षी सुवर्ण, दुसऱ्या वर्षी रौप्य आणि तिसऱ्या वर्षी कांस्य पदक पटकावलं आहे. तर राज्य स्तरावर सलग पाच वेळा सुवर्ण पदक मिळवलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरच्या आमदार निवासमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार