रायगड जिल्हयात हरिहरेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेलेली अन्नपूर्णा समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भर समुद्रात ही बोट बंद पडल्यानंतर ही बोट दुसऱ्या बोटीच्या मदतीने हर्णे येथे आणत असताना अगदी थोडे अंतर शिल्लक असताना हर्णे बंदराजवळ बुडाल्याची घटना घडली आहे.
भर समुद्रात अन्नपूर्णा नौका बंद पडली. यानंतर तत्काळ जवळच असलेल्या बोटीशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर 'अल हम्द' IND-MH-4-MM-4 150 ही नौका विलंब न लावता मदतीला धावली. या मदतीमुळे चांगा भोईणकर, नंदकुमार चांगा भोईणकर हे सुखरूप बचावले आहेत. या बोटीने बंद पडलेल्या अन्नपूर्ण या बोटीला खेचून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हर्णे बंदराजवळ असलेल्या बत्तीसमोर बोट आली व प्रचंड सोसाट्याचा वारा आणि प्रचंड लाटा यांमुळे बोटीचा मुख्य भाग निखळला. हर्णे बंदरात बत्तीजवळ येता येता या बोटीचे अक्षरशः दोन तुकडे झाले.
या दुर्घटनेत बोटीचे तब्बल चार लाख साठ हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. ही दोन सिलेंडरची बोट होती. हा सगळा प्रकार शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. केळशी उटंबर येथील चांगा भोईनकर यांच्या मालिकीची ही बोट आहे.